अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली निवड यादी लांबणीवर   

पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली निवड यादी तांत्रिक समस्येमुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. नव्या वेळापत्रकानूसार पहिली यादी आता ३० जून रोजी जाहीर होणार आहे. येत्या १ जूलैपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेचा घोळ संपत नसल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालयमार्फत अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानूसार पहिल्या नियमित फेरीची निवड यादी व कनिष्ठ महाविद्यालयांचे कटऑफ गुण गुरूवारी रोजी प्रसिद्ध केले जाणार होते.
 
कोटा प्रवेश फेरी संपून १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तसेच डेटा पडताळणीमुळे पहिल्या यादीला विलंब होणार असल्याचे सुरूवातीला कळविण्यात आले होते. मात्र तांत्रिक समस्येमुळे महाविद्यालयांचे कटऑफ गुण जाहीर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पहिली यादी येत्या सोमवार दि. ३० जूनपर्यंत लांबणीवर गेली आहे. १ जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे.
 
दरम्यान, वेळापत्रकानूसार १ ऑगस्टला अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. परंतू, जून महिना संपत आला तरी प्रवेशप्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार याची विचारणा विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच शिक्षण विभागाला तांत्रिक समस्या मागील १५ दिवसांत का सोडविता आल्या नाहीत? असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
अकरावीची पहिली यादी व महाविद्यालयांचे कटऑफ गुण ३० जून रोजी जाहीर होणार आहेत. तांत्रिक समस्येमुळे गुरूवारी रोजी यादी कटऑफ गुण जाहीर करता आले नाहीत. त्यामुळे यादी काही दिवस लांबणीवर टाकली. विद्यार्थ्यांना येत्या १ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेश घेता येतील.
 
- महेश पालकर, संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

Related Articles