सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक   

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या सराईत गुंडाला वारजे पोलिसांनी अटक केली. आकाश सिब्बन गौड (वय २३, शिवणे, मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरोधात वारजे माळवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
 
गौड याने साथीदारांसह ५ ऑक्टोबर २०२२ रोजी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून शुभम मानकर याच्यावर कोयत्याने वार केले होते, तसेच त्याला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौड याच्यासह साथीदारांविरोधात वारजे पोलिसांनी मकोकांतर्गत कारवाई केली होती. दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केट यार्ड पोलिसांनी गौडसह साथीदारांविरोधात मकोका कारवाई केली होती. मात्र, मकोकाची कारवाई झाल्यानंतर गौड पसार झाला होता.
 
पसार झालेल्या गौडचा शोध घेण्यासाठी वारजे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गेले होते. त्याच्या नातेवाईकांसह मित्रांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा गौड हा तेलंगणा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. तो वास्तव्याचे ठिकाण सातत्याने बदलत होता. गौड हा वारजे-एनडीए रस्त्यावर असलेल्या शिवणे भागात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे यांना खबर्‍याने दिली. त्यानंतर, शिवणे भागातील मैदानावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.
 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, अंमलदार सागर कुंभार, गणेश शिंदे, योगेश वाघ, अमित शेलार, बालाजी काटे, निखिल तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमोल झणझणे आणि गोविंद कपाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 
गुन्हे शाखेची कारवाई
 
मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेल्या कात्रज भागातील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. रुपेश राजन केंद्रे (वय १९, सच्चाईमाता मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. आंबेगाव पोलिसांनी केंद्रे आणि साथीदारांविरोधात मकोकांतर्गत कारवाई केल्यानंतर तो फरार झाला होता. तो कात्रज भागात आल्याची माहिती उज्ज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली. त्यावरून, पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, मोकाशी, कुंभार, शंकर नेवसे, संजय जाधव आणि निखिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles