इराण, इस्रायलमधून ६५० भारतीय सुरक्षितपणे बाहेर   

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमधील तणावादरम्यान भारताने मंगळवारी इराणमधून २९२ नागरिक आणि इस्रायलमधून ३६६ नागरिकांना बाहेर काढले. भारताने आतापर्यंत इराण आणि इस्रायलमधून २,२९५ भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
 
काल सकाळी ८:२० वाजता अम्मानहून एका चार्टर्ड विमानाने १६१ भारतीय मायदेशी परतले. ते आधी इस्रायलची सीमा ओलांडून जॉर्डनला आले. त्यानंतर, १६५ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे सी-१७ लष्करी विमान नवी दिल्लीला आले. केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पहाटे ३:३० वाजता मशहदहून नवी दिल्लीत विशेष विमान पोहोचले. यामध्ये २९२ भारतीय होते. ‘ऑपरेशन सिंधू’ची माहिती देताना जयस्वाल म्हणाले, आतापर्यंत २,२९५ भारतीय इराणमधून मायदेशी परतले आहेत. 

कतारमधील भारतीयांना घरातच राहण्याचा सल्ला

दोहा : इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर येथील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली. या अंतर्गत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करतानाच भारतीय नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणने कतारमधील अल उदेद हवाई तळावर तैनात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर सोमवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने सध्याची परिस्थिती लक्षात घेता सावधगिरी बाळगण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. कृपया शांत रहा आणि कतार अधिकार्‍यांनी दिलेल्या स्थानिक सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा, असे दूतावासाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. बहरीनमधील भारतीय दूतावासानेही भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. 
 

Related Articles