बळींची संख्या ३६ वर; एक कोटीची भरपाई   

तेलंगणातील स्फोट

संगारेड्डी, (तेलंगणा) : तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील बळींची संख्या ३६ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना एक कोटींची भरपाई देण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे पशामिलाराम औद्योगिक वसाहतीतील सिगाची फार्मा कंपनीशी चर्चा करत आहेत.
 
रेड्डी यांनी काल स्फोटस्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. तसेच, जखमींची विचारपूस केली.  स्फोटातील गंभीर जखमींना १० लाख, कमी प्रमाणात दुखापत झालेल्यांना पाच लाखांची आर्थिक मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.
 
राज्य सरकार कंपनी व्यवस्थापनाशी  मृतांच्या वारसांना एक कोटीची मदत कशी करता येईल, याबाबत चर्चा करत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना १ लाख आणि जखमींना ५० हजारांची तातडीची मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. मृत कामगारांमध्ये बहुतांश ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणातील आहेत. स्फोटाच्या वेळी कारखाना परिसरात १४३ जण होते. त्यापैकी, ५६ जण संपर्कात आहेत. उर्वरित, कामगारांचा शोध सुरू आहे, असेही ते म्हणाले.
 

Related Articles