लाच मागणार्‍याला अटक   

पुणे : घराच्या खरेदी खताची प्रत काढून देणार असल्याचे सांगून, मामलेदार कचेरीतील अधिकार्‍यांच्या नावाखाली लाच घेणार्‍या दुय्यम निबंधक कार्यालयातील खासगी महिला रायटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. अनिता विनोद रणपिसे (वय 54, जेजुरी जकातनाका, नारायणपूर रोड, सासवड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मामलेदार कचेरीतील तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली 1 यांच्या कार्यालयात खासगी रायटर म्हणून काम करतात. याबाबत 45 वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली होती.
 
तक्रारदार यांना घर तारण ठेवून कर्ज काढायचे होते. कर्ज काढण्यासाठी बँकेत दिलेल्या अर्जासोबत त्यांना त्यांच्या 1987 मधील घराची खरेदीखताची प्रत आवश्यक होती. ही प्रत मिळविण्यासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली 1 यांच्याकडे कर्ज केला होता. अनिता रणपिसे या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेरील आवारात खासगी रायटर म्हणून काम करतात.
 
तक्रारदार हे त्यांना आवश्यक असलेल्या खरेदीखताची प्रत मिळण्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज घेऊन गेले असता तेथे हजर असलेल्या खासगी व्यक्ती अनिता रणपिसे यांनी खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तक्रारदारांकडे कार्यालयातील अधिकार्‍यांसाठी 5 हजार आणि स्वत:साठी 1 हजार रुपये अशा 6 हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांनी 26 जूनला याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने 27 व 30 जूनला पंचासमक्ष पडताळणी केली असता, अनिता रणपिसे यांनी 6 हजारांची मागणी करुन त्यापैकी आगाऊ रक्कम म्हणून 3 हजार रुपये द्या व काम झाल्यावर बाकीचे द्या, असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे समोर आले.
 
एसीबीने मंगळवारी (1 जुलै) हवेली तहसिल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सापळा रचला. अनिता रणपिसे हिने तक्रारदाराकडून 6 हजार रुपये स्वीकारुन त्यातील 1 हजार रुपये तक्रारदाराला परत केले. लाच स्वीकारल्यानंतर एसीबीने अनिता रणपिसे हिला पकडून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles