तेहरान मुस्लिम जगताच्या नेतृत्वाच्या भूमिकेत   

मेहबूबा मुफ्ती यांचे मत

श्रीनगर : इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे तेहरान मुस्लिम जगताच्या नेतृत्वाच्या भूमिकेत आला असून, त्याने वॉशिंग्टन आणि जेरुसलेमला गुडघे टेकायला लावले आहेत, असे मत पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी व्यक्त केले.मुफ्ती म्हणाल्या, या युद्धात इराणी नेतृत्व, त्यांच्या सशस्त्र दलांचे आणि नागरिकांच्या धैर्याचे आणि दृढनिश्चयाला मी सलाम करते. त्यांच्याकडे अण्वस्त्रे नव्हती, त्यांच्याकडे एकमेव शस्त्र होते ते म्हणजे श्रद्धा आणि हौतात्म्याची इच्छा. यामुळे अमेरिका आणि त्याचा मित्र असलेला इस्रायलला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धबंदीबद्दल बोलत आहेत. याचा अर्थ असा, की आतापर्यंतच्या युद्धाचा निकाल अमेरिका आणि इस्रायलच्या अपेक्षांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
 
मुफ्ती म्हणाल्या, या युद्धामुळे इराण मुस्लिम जगात नेतृत्वाच्या भूमिकेत आला आहे. जरी इतर मुस्लिम देशांनी दिखाव्यापुरते समर्थन दिले. अमेरिकेला स्वत:च्या मर्जीने मुस्लिम देशांवर हल्ला करण्याची सवय होती, मग ते इराक असो, अफगाणिस्तान असो, लिबिया असो किंवा सीरिया असो. आज मुस्लिम देशांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात अमेरिकेला पराभव पत्करावा लागला आहे.
 
पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केल्यावर प्रतिक्रिया देताना मुफ्ती म्हणाल्या, हे एक बालिश आणि अपरिपक्व पाऊल आहे. पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करणे हे निराशाजनक आहे. ज्या व्यक्तीला माहीत नाही, की तो काय बोलत आहे आणि पुढच्या क्षणी तो काय करणार आहे.
 

Related Articles