ढोल-ताशा पथकांना सरावासाठी नाही जागा   

पिंपरी : गणेशोत्सवाच्या आधी ढोल-ताशा पथकांच्या सरावास सुरुवात होत असते. त्यामुळे शहरातील काही भागांत ढोल-ताशा वादनाचा दणदणाट ऐकू यायला लागला आहे. आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी नागरी वस्तीपासून दूर सराव करायला लागतो. मात्र, शहरात सध्या ढोल-ताशा वादनास पुरेशी जागा नसल्याची खंत ढोल-ताशा पथकांकडून व्यक्त केली जात आहे.
 
गणेशोत्सवाच्या दोन महिने अगोदरच ढोल-ताशा पथकांच्या सरावास सुरुवात होत असते. गणेशोत्सवात वाजविल्या जाणार्‍या ढोल-ताशांची क्रेझ तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील आढळून येते. दरवर्षी गणेशोत्सवात ही ढोल ताशा पथके खेळातील नवीन प्रकार सादर करतात. शहरात जवळपास ८० ते ९० ढोल-ताशा पथके आहेत. एका पथकात ५० ते १५० मुले-मुली असतात. यामध्ये १० वर्षापासून ५५ वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. ढोल-ताशा पथकांची सुरुवात सुरुवातीला जागा पाहणे त्यानंतर वादनाला सुरुवात होते. सरावासाठी पुरेशी जागा आणि वादनासाठी वेळेची मर्यादा पाळावी लागते. तसेच ढोल-ताशा पथक यांना मनुष्यवस्तीपासून दूर सराव करावा लागत असल्याने नदीघाट, मोकळे मैदान यावर सराव करावा लागतो. नाहीतर जवळ राहणार्या नागरिकांना वादनाचा त्रास होतो.
 
सध्या शहरात ढोल-ताशा वादनासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. ज्यांची मालकी हक्काची जागा आहे त्यांच्याकडून ज्यादा भाडे आकारले जाते. ते पथकांना परवडत नाही. पथक जागेच्या शोधात आहेत. अद्याप काहींनी सरावास सुरुवात केली नाही, तर काहीं पथकांचा सराव सुरू आहे. पथकात नवीन वादकांचा समावेश असतो. त्यांना जास्त सरावाची गरज असते. त्यामुळे पथकांना दोन ते अडीच महिनेअगोदर सराव सुरू करावा लागतो. पथकात वादनावेळी एकाग्रता व एकसूत्रीपणा लागतो. त्यामुळे वादनाच्या वेळी पथकातील वादकांमध्ये लयबद्धता दिसते. यामागे खूप दिवसांचा सराव असतो.
 
पालिकेकडून जागा उपलब्ध होत नाही
 
ढोल-ताशा पथकांनी महापलिकेकडे जागेची मागणी केली आहे. मात्र, अद्याप ढोल-ताशा पथकांंना सरावासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पथकांना भाडे भरून सराव करावा लागतो. दोन महिन्यांसाठी ५० ते ६० हजार भाडे आकारले जाते. पण दिवसेंदिवस जागा कमी पडत आहे. वादन साहित्य ठेवण्यासाठी गोदाम लागते. तसेच सरावासाठी शेड मारावे लागते. यासाठी खर्च करावा लागतो.
 
जुन्या पथकांची हक्काची जागा
 
ज्या ढोल-ताशा पथकांना १० ते १५ वर्षे झाली आहेत. त्यांना शहरात सरावासाठी हक्काच्या जागा आहेत. नदीघाट, महापालिकेची मैदाने यावर ते सराव करतात. मात्र, दरवर्षी नवीन पथकांची वाढ होत असते. नवीन पथकांना सराव करायला जागा मिळत नसल्यामुळे पुलाच्या खाली सराव केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. यासाठी मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन यांच्या पार्किंगमध्ये वादनास जागा द्यावी, अशी मागणी पथकांकडून होत आहे.
 
नागरीवस्तीजवळ सराव, वादनाचा त्रास
 
नागरीवस्ती जवळ असणार्‍या मैदानात किंवा पुलाजवळ वादन केल्याने नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. दररोज तीन ते चार तास वादनाचा सराव केला जातो. त्यामुळे परिसरात राहणार्या नागरिकांना लहान मुले, ज्येष्ठांना तसेच आजारी व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरीवस्तीजवळ सराव करण्यासाठी मनाई केली जात आहे.

Related Articles