माउलींची वारी, खंडोबाच्या द्वारी   

जेजुरी, (वार्ताहर) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा नगरीत दाखल झाला. जेजुरकरांनी माउलींच्या पालखीवर भंडार्‍याची मुक्त उधळण करीत सोहळ्याचे स्वागत केले. संत सोपान देवांच्या सासवड नगरीतील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोहळा जेजुरी मुक्कामासाठी सकाळी सहा वाजता रवाना झाला. बोरावके मळा येथील न्याहरीनंतर सोहळा यमाई शिवरी येथे सकाळी ११ वाजता  विश्रांतीसाठी विसावला. यावेळी शिवरी गावचे सरपंच प्रमोद जगताप, माजी सरपंच बबन कामठे यांनी स्वागत केले. 
 
यावेळी शिवरी पंचक्रोशीतील नागरिकांनी माउलींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साकुर्डे फाटा येथील विसाव्यानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याचे तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत आगमन झाले. मार्तंड देव संस्थांच्यावतीने भंडारा उधळून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. मार्तंड देव संस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पांडुरंग थोरवे, अनिल सौदाडे, खोमणे, राजेंद्र खेडेकर यांनी स्वागत केले.  जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले व सर्व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. तर, खंडोबा गडावर वारकरी बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी हजारो वारकर्‍यांनी मुक्तपणे भंडार खोबर्‍याची उधळण करीत कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले.
 

Related Articles