मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज   

कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट 

पुणे : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. आज (गुरुवारी) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांतील घाट विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पाऊस सक्रीय झाला असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
आज कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाट विभागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून घाट विभागातील पाऊस कमी झाला होता. मात्र आता कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असल्याने पावसाचे पुनरागमन झाले आहे. घाट विभागातील पाऊस वाढला आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
 
धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटात मुसळधार पाऊस पडणार आहे. यावेळी ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती या जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
शहरात 24 तासात पडलेला पाऊस
 
ठिकाण            पाऊस
एनडीए          8.5 मिमी
पाषाण           9.7 मिमी
शिवाजीनगर   8.1 मिमी
लोहगाव         4.5 मिमी
हडपसर         3.0 मिमी
 
धरण क्षेत्रात पडलेला पाऊस 
 
धरण                     पाऊस    टीएमसी     टक्केवारी
खडकवासला 8.0 मिमी      1.28      64.75
पानशेत                 45 मिमी      5.47      51.37
वरसगाव                52 मिमी      7.46     58.17
टेमघर                    82 मिमी      1.54     41.48
एकूण                   187 मिमी    15.74     54.01
मागील वर्षी               --              4.35     14.92
 
पुण्यात हलका ते मध्यम पाऊस
 
मागील चार दिवसांपासून शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र आज (गुरूवारी) ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. काल दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सकाळच्या सत्रात शहरासह उपनगरात बहुतांश रस्त्यांवर पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सायंकाळीही चौकाचौकांत वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

Related Articles