टाकीत बुडालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना अकरा लाखांची भरपाई   

महापालिकेवर निष्काळजीपणाचा ठपका

पुणे : मुलाचा शौचालयाच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत त्याच्या कुटुंबीयांना 11 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी दिला. याप्रकरणी महानगरपालिकेवर हलगर्जी आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 
कसबा पेठ परिसरात 9 एप्रिल 2018 रोजी घडलेल्या घटनेत तुषार बाबू रामोशी या बारा वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पुणे महानगरपालिका, आयुक्त, बांधकाम व नियंत्रण विभाग व आरोग्य विभागाच्या प्रमुखांविरोधात दावा दाखल करण्यात आला होता. तुषारची आई या मोलकरीण, तर वडील बिगारी काम करतात. घटनेच्या दिवशी तुषार रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शौचालयासाठी गेला होता. मात्र, बराच वेळ जाऊन तो परतला नाही. त्यानंतर त्यांनी इतरत्र शोध घेतला. 
 
अधिक शोध घेतला असता तो शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत तरंगत असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले असता त्याचा पाण्यात बुडाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालातूनही ते स्पष्ट झाल्याने महापालिका आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणासह निष्काळजी आणि कर्तव्यात कसूर केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नमूद करीत रामोशी दाम्पत्याने वकील अमित राठी व वकील पूनम मावाणी यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. त्यांना वकील आदित्य जाधव व वकील प्राची जोग यांनी सहकार्य केले. 
 
मागणीला न्यायालयाची मंजुरी 
 
मुलाच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांकडून तुषारवर झालेला रुग्णालयाचा खर्च म्हणून 80 हजार रुपये, अंत्यविधीचा खर्च 20 हजार रुपये, मानसिक धक्क्यापोटी 5 लाख रुपये, तर कुटुंबीयांना सोसाव्या लागलेल्या उत्पन्नाऐवजी नुकसानीची रक्कम 45 लाख रुपये, असे एकूण 51 लाख रुपये नुकसान झाल्याचे नमूद केले. मात्र, कुटुंबीयांची मुद्रांक शुल्क देण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी 11 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी करीत त्यावर 12 टक्के व्याज मिळावे, यासाठी न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. 

Related Articles