अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन   

पुणे : वाहतूक पोलिसांकडून माल वाहतूक करणार्‍या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले तसेच औषधांची वाहतूक करणार्‍या गाड्यांच १ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.वाहतूक पोलिसांकडून जबरदस्तीने होणारी दंड वसूली तात्काळ बंद करावी.
 
याआधी आकारण्यात आलेले दंड माफ करावे, क्लिनरची सक्ती रद्द करण्यात यावी, व्यावसरयिक वाहनांना प्रवेश बंदी बाबत व वेळेच्या बाबतीत विचार करावा. ई-चलन बाबतच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. आदी मागण्या दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघातर्फे करण्यात आल्या आहेत. तसे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागात असलेल्या नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठेतील भुसार बाजार, तसेच मार्केटयार्डातील भुसार बाजारात अन्नधान्य वाहतूक करणार्‍या माल मोटारी, टेम्पो माल वाहतूकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर जड वाहनांवर वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणार्‍या गाड्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले तसेच औषधांची वाहतूक करणारी वाहने आंदोलनात सहभागी होणार आहेत.
 
न्याय व हक्कासाठी आंदोलन 
 
राज्यातील लाखो वाहतूकदारांचे कुटुंब या व्यवसायावर अवंलबून आहे. त्यामुळे हे आंदोलन विरोधासाठी नसून रोजीरोटी आहे. वाहतूकदारांच्या न्याय व हक्कासाठी आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल. त्यात मालमोटारी, टेम्पोसह छोटे टेम्पो, प्रवासी रिक्षांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. 
 
- डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघ.

Related Articles