हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा   

पुणे : शाळा भरल्याची घंटा, वर्गात जाण्याची लगबग, नैमित्तिक प्रार्थना, ‘एकसाथ नमस्ते’ असे म्हणत शिक्षकांना केलेले अभिवादन, विद्यार्थिनी व शिक्षिकांच्या हस्ते झालेले सामूहिक दीपप्रज्वलन अशा भारावलेल्या वातावरणात सुमारे ५० वर्षांनंतर हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींनी अनुभवला इयत्ता दहावीचा वर्ग..!
 
१९७५ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी विनिता पिंपळखरे, हेमलता देशपांडे, विभावरी ठकार, संध्या देशपांडे, मीना साने यांच्या पुढाकारातून रविवारी हुजुरपागा शाळेतील अमृत महोत्सव सभागृहात सुवर्ण महोत्सवी मेळाव्यााचे आयोजन करण्यात आले होते.नारायण पेठेत असलेली हुजुरपागा ही शाळा स्वातंत्र्यपूर्व भारतातील फक्त मुलींसाठी असलेली दुसरी शाळा आहे. ११वी मॅट्रिक परीक्षा पद्धती बंद झाल्यानंतर १९७५ सालात एसएससी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तुकडीचा स्नेहमिलन सोहळा होता. १९७५ मधील दहावीच्या तुकडीला शिकविणार्‍या डॉ. अपर्णा जोशी, सुलभा गोरे, जयश्री बापट, उमा वाळिंबे या ज्येष्ठ शिक्षिकांची विशेष उपस्थिती होती.
 
विद्यार्थिनींनी केलेले विविध गुणदर्शन पाहून जणू आपण स्नेहसंमेलन अनुभवतो आहे, असा अनुभव प्रत्येकास आला. चित्रपट, भावगीतांसह, नाट्यगीते भारती जोग, मंजुषा दाते, मोहिनी अत्रे, रसिका एकबोटे यांनी सादर केली. जयंत साने (संवादिनी), दीपक उपाध्ये (तबला) यांनी साथसंगत केली.सीमाशुल्क विभागातून निवृत्त झालेल्या मीना साने-करमकर तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या हेमलता देशपांडे यांनी आपआपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले. जयश्री बापट यांनी विद्यार्थिनींना ‘नमस्ते’ असे संबोधन करून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनिता पिंपळखरे यांनी केले.

Related Articles