माळेगाव निवडणुकीत अजित पवार यांचा गुलाल   

२१ पैकी २० जागा जिंकल्या

बारामती, (प्रतिनिधी) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित गट) नीलकंठेश्वर पॅनलने दणदणीत यश मिळवत २१ पैकी २० जागांवर विजय मिळविला. या विजयानंतर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांची पकड अधिक बळकट झाली असून, विरोधी पॅनलला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख व माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे, तर फक्त ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हेच विजयी झाले आहेत.मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी दोन दिवस आणि एक रात्र सुरू होती. निकाल स्पष्ट झाल्यानंतर नीलकंठेश्वर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची जोरदार उधळण केली.
 
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि तावरे यांच्यातील हा सामना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता. अजित पवार यांनी या निवडणुकीत निर्णायक विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.रंजनकुमार तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याशी संबंधित असून, अध्यक्ष आणि संचालक या पदांवरही त्यांनी काम पाहिले आहे. परंतु, यावेळी पराभव झाल्यानंतर त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी मतदानादरम्यान विरोधी गटाचे २० उमेदवार विजयी झाले तर आपण राजकारणातून निवृत्त होऊ, असे वक्तव्य केले होते. 
 
यंदाची निवडणूक ’गुरू-शिष्य’ संघर्ष म्हणूनही पाहिली जात होती. एकीकडे, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे तर दुसरीकडे त्यांचे शिष्य रंजनकुमार तावरे. मात्र, सहकार बचाव पॅनल अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलपुढे टिकू शकले नाही. दुसरीकडे, शरद पवार यांच्या समर्थक बळीराजा पॅनलचाही प्रभाव दिसून आला नाही. निकालानुसार सहकार बचाव व बळीराजा पॅनलचा धुव्वा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
या विजयानंतर माळेगाव कारखान्यातील सत्तेचे गणित पूर्णतः अजित पवार यांच्या बाजूने झुकले असून, आगामी काळात या विजयाचा परीघ बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणातही जाणवेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.या निकालाने माळेगाव कारखान्यातील सत्तांतर पूर्णत्वास गेले असून, येणार्‍या काळात सहकार क्षेत्रातही त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

निकाल

नीलकंठेश्वर पॅनल (अजित पवार) : २० जागा विजयी
सहकार बचाव पॅनल (रंजनकुमार तावरे) : १ जागा (फक्त चंद्रराव तावरे विजयी)
बळीराजा बचाव पॅनल (शरद पवार समर्थक) : ० जागा
 

Related Articles