न्यू साउथ वेल्सच्या किनार्‍यावरील वादळ तीव्र होणार?   

नॉर्मन गार्डन : न्यू साउथ वेल्सच्या किनार्‍यावर एक तीव्र वादळ निर्माण होत आहे. जे मागील तीन वर्षांत पूर्व किनार्‍यावर धडकणारे पहिले मोठे वादळ ’ईस्ट कोस्ट लो’ असू शकते. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी किनार्‍याजवळ पोहोचण्यापूर्वी हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि उंच लाटा येतील.
 
हे वादळ सध्या कॉफ्स हार्बरच्या दक्षिणेकडील समुद्रात सक्रिय आहे. याच भागाला गेल्या महिन्यात मोठ्या पुराचा सामना करावा लागला होता. या वादळामुळे सखल आणि किनारी भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

’ईस्ट कोस्ट लो’ म्हणजे काय?

’ईस्ट कोस्ट लो’ ही तीव्र वादळ प्रणाली असून, जी सामान्यतः हिवाळ्यात उद्भवते. जी दक्षिण क्वीन्सलँड ते टास्मानियापर्यंत कोणत्याही किनारपट्टीच्या भागावर परिणाम करू शकते. यावेळी समुद्राचे तपमान जास्त असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. ज्याप्रमाणे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे समुद्राच्या उष्णतेमुळे बळकट होतात, त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीवरील कमी दाबाची चक्रीवादळे उष्ण पाण्यामुळे लवकर तीव्र होऊ शकतात. हे वादळ इतके वेगाने तीव्र झाले आहे, की तज्ज्ञ त्याला ’हवामान बॉम्ब’ म्हणत आहेत. जर ही प्रणाली अंदाजे विकसित झाली तर वादळाच्या दक्षिणेकडील भागात यामुळे घरे, झाडे आणि समुद्रकिनार्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते. 

वादळ किती भयानक असेल?

सध्या तरी, हे वादळ किती तीव्र असेल, हे सांगणे कठीण आहे. त्याचा परिणाम ते किती तीव्र आहे आणि किनार्‍यावर किती जवळून आदळते यावर अवलंबून असेल. मागील ’ईस्ट कोस्ट लो’ वादळांमुळे व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी जाणे, वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित होणे, असे गंभीर परिणाम झाले आहेत. हवामान खात्याने मंगळवारपासून जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. संपूर्ण आठवड्यासाठी धोकादायक समुद्र परिस्थितीचा इशारा जारी करण्यात आले आहेत. न्यू साउथ वेल्सच्या किनार्‍यावरील समुद्राच्या पृष्ठभागाचे तपमान सामान्यपेक्षा १ ते २.५ अंश सेल्सिअस जास्त आहे, ज्यामुळे हे वादळ अधिक तीव्र होईल.

हवामान बदलाची भूमिका

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, की हरितगृह वायूंमुळे निर्माण होणार्‍या अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे ९० टक्के उष्णता समुद्राद्वारे शोषली जाते. यामुळे, जगातील महासागर विक्रमी पातळीपर्यंत गरम झाले आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियातील शैवालांची मोठी वाढ असो किंवा पश्चिम ऑस्ट्रेलियातील निंगलू रीफवर परिणाम करणारी सागरी उष्णतेची लाट असो, हे सर्व उष्ण समुद्राचे परिणाम आहेत. भविष्यात, ’पूर्व किनारपट्टीवरील’ वादळांची संख्या कमी होऊ शकते; परंतु निर्माण होणारी वादळे आणखी प्राणघातक असू शकतात. हवामान जसजसे गरम होत जाईल तसतसे या वादळांमुळे मुसळधार पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीला पूर, किनारपट्टीची धूप आणि समुद्रकिनार्‍यांचे नुकसान होण्याचा धोका वाढेल.
 

Related Articles