पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर   

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळे पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. 
 
कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक वेगाने पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ६३ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगे धरणाचा समावेश आहे.  पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, राजापूर, रुई, इचलकरंजी तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे आळवे, यवलूज बंधार्‍यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून भोगावती नदीवरील हळदी राशिवडे, शिरगाव, कोगे दूधगंगा नदीवरील दत्तवाड यांसह जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.
 

Related Articles