महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दवाढ, तसेच चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शहर विकास क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी  आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
 
या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले असून, संबंधित भागातील स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ अधिकारी आणि नागरी संघटनांसोबत सविस्तर सल्लामसलत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे व गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यास राज्य सरकारने अनुकूलता दर्शविल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली आहे. आयटी कंपन्यांचा मोठा जमाव, वाढती लोकसंख्या, आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही स्थिती लक्षात घेता या भागाचा पालिकेत समावेश अत्यावश्यक आहे. तसेच, आयटी कर्मचार्‍यांच्या वतीने UnclogHinjawadiITPark ही स्वाक्षरी मोहीम देखील सुरू करण्यात आली असून, हिंजवडी व परिसराच्या समावेशाची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
 
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, सध्या क्षेत्रफळ वाढल्यामुळे महापालिकेवर सेवा पुरवठ्याचा ताण वाढला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी व राजगुरुनगर या नगरपरिषदांचा स्वतंत्र महापालिका म्हणून विकास करण्यास हरकत नाही, असे मत महापालिकेने शासनास कळवले आहे. हा संपूर्ण परिसर झचठऊA च्या हद्दीत असून, त्याचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसर शाश्वत विकासाचे रोल मॉडेल बनू शकतो, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका हद्दवाढ आणि नवीन महापालिकेच्या स्थापनेबाबत सविस्तर बैठक लवकरच आयोजित व्हावी, अशी नम्र विनंती आमदार लांडगे यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

Related Articles