सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब   

प्रमाणापेक्षा अधिक खेळाडूंकडून वापर 

पुणे : महापालिकेने ८ कोटी रुपये खर्च करुन स्वागरेट भागात सिंथेटिक ट्रॅक असलेले सणस मैदान तयार केले आहे. या मैदानावरील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंना सराव करता यावा, आणि त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये यश मिळवावे असा हेतू आहे. परंतु काही प्रशिक्षकांच्या तसेच स्थानिक नागरिकांमुळे नवख्या खेळाडूंना आणि पोलीस भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांना या ट्रॅकवर सराव करुन दिला जात आहे. परंतु या खेळाडूंसाठी हा ट्रॅक नसून तो अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी आहे. तसेच या मैदानावर प्रमाणापेक्षा अधिक खेळाडू येत असल्यामुळे ट्रॅक खराब होत असून पालिकेला देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा फटका बसत आहेत.
 
पालिकेकडून ८ जून पासून खेळाडूंच्या सरावास बंदी घातली आहे, प्रशिक्षक, खेळाडू, आणि पालकांमध्ये यामुळे असंतोषाचे वातावरण  निर्माण झाले आहे. असा आरोप करुन महाविकास आघाडीच्या वतीने पुणे पालिकेचे क्रीडा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे या मैदानाच्या वापरावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील अशी मैदाने ही खेळाडूंसाठीच आहेत, तसेच चांगले खेळाडू घडावेत, यासाठीच पालिकेने मैदाने तयार केली आहेत. मात्र सणस मैदानावर कोणत्याही प्रकारची खेळाडूंना बंदी घातलेली नाही. असे स्पष्टीकरण क्रीडा विभागाने दिले आहे.
 
शहरात अ‍ॅथलेटिक्स खेळाडूतयार व्हावेत यासाठी या मैदानावर ४०० मीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार केला आहे. या मैदानावर लांब उडी व तिहेरी उडीसाठी दोन ठिकाणी स्वतंत्र पिट आणि भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज आदीसाठी देखील मैदान तयार केले होते. तसेच ट्रॅकच्या आतील भागात असलेल्या मैदानावर लॉन बसविण्यात आली असून, लांबउडी, तिहेरी उडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट, स्टेपल चेज आदी क्रीडा प्रकारासाठी प्लॉट तयार केले आहे. 
 
या मैदानावर १२ वर्षावरील खेळाडूंनी नियमाने सराव करणे अपेक्षित आहे. तसेच खेळाशी संबंधित असलेल्या विविध संघटनांचे देखिल हेच मत आहे. १२ वर्षाखाली खेळाडूंनी जर या ट्रॅकवर सराव केला तर शारीरिक इजा होऊ शकतो. भविष्यात त्यांना शरीराच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या वयोगटातील खेळाडूंनी हा ट्रॅक वापरुन नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

प्रशिक्षकांचा मनमानी कारभार

सणस मैदानावर नेमण्यात आलेल्या प्रशिक्षकांनी खेळाडूंचा सराव घेणे अपेक्षित आहे. परंतु ते स्वत: न थांबता त्यांच्यावतीने दुसर्‍या व्यक्तीला मैदानावर उभे करत आहेत. तसेच पालकांना चुकीची माहिती देवून तसेच मोठी आश्वासने देऊन १२ वर्षाखालील खेळाडूंचा या ट्रॅकवर सराव घेतला जात आहे. १२ वर्षाखालील खेळाडूंनी मातीच्या मैदानावर सराव करणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी सराव करुन नये, असे पालिकेचे म्हणणे आहे. शहरात विविध पोलीस भरतीच्या अकॅडमी आहेत, या अकॅडमींच्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांची या मैदानावर सराव घेतला जातो. ज्या खेळाडूंना सिंथेटित ट्रॅकचा सराव नसतो, त्यांनी जर या ट्रॅकचा वापर केल्यामुळे ट्रॅक खराब होत आहे. त्यामुळेच पालिकेकडून १० लाख रुपये खर्च करुन देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
 
सणस मैदानावरील सिंथेटिक ट्रॅक खराब झाला होता. त्याची दुरुस्ती करण्याचे पत्र भवन विभागाकडून देण्यात आले होते. ट्रॅकची पाहणी करुन दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅक बंद ठेवण्यात आला होता. या ट्रॅकवर १२ वर्षाखालील खेळाडूंनी सराव करुन नये, कारण त्यांना शारारिक इजा होण्याचा धोका असतो. अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंना सराव करताना इतर खेळाडूंची त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. मध्येच एखादा खेळाडून आल्यामुळे अ‍ॅथलेटिक्स खेळाडू्ंना इजा होत असल्याचे समोर आले आहे. तक्रारी आल्यानुसार याबाबक सोमवारी (दि. ३०) बैठक लावण्यात आली आहे.

किशोरी शिंदे, प्रमुख, क्रीडा विभाग, पुणे महापालिका.  

 

Related Articles