एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्‍या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण   

पुणे : बावधन परिसरातील एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्‍या वाहतूक सूचनांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एन.डी.ए चौक (चांदणी चौक) ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिक आपली वाहने उभी करून दुकानांत किंवा कार्यालयांत पत्ता विचारण्यासाठी जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे महापालिका आयुक्त तसेच बावधन वाहतूक विभागातील ठाणे अंमलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
 
या मार्गावर नो पार्किंग अथवा सम-विषम तारखेस वाहन उभे करण्यासंबंधीचे फलक नसल्यामुळे वाहनधारक गोंधळात पडतात. यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये रोजच वादाची स्थिती निर्माण होत आहे. नागरिकांनी याविषयी अनेक वेळा तक्रारी केल्या असून, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. याबाबत येत्या आठ दिवसांत प्रशासनाने तोडगा न काढल्यास मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles