अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी उद्या होणार जाहीर   

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित ‘कॅप’ फेरीतील निवड यादी  उद्या गुरुवारी (२६ जून) जाहीर होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालयांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कट-ऑफ जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
 
राज्यभरात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २१ लाख २३ हजार ७२० जागांसाठी आतापर्यंत १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ‘कॅप’अंतर्गत १६ लाख ६० हजार ८४ जागा उपलब्ध आहेत, तर व्यवस्थापन कोट्याअंतर्गत चार लाख ६३ हजार ६३६ जागा उपलब्ध आहेत.
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या नियमित फेरीतील लॉटमेंट प्रवेशाच्या पोर्टलवर गुरुवारी जाहीर होईल. याचदिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय आणि महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी असणार्‍या विद्यार्थ्यांची यादी दर्शविली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील संदेश पाठविले जातील आणि पहिल्या नियमित फेरीचा कट-ऑफ जाहीर होईल.
 
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीचे वेळापत्रक 
 
नियमित फेरीसाठी लॉटमेंट जाहीर करणे, विद्यार्थी आणि महाविद्यालय लॉगिंनमध्ये तपशील दर्शविणे, महाविद्यालयांचा कट-ऑफ जाहीर करणे : २६ जून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
 
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे, महाविद्यालयांनी प्रवेशासाठी लॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. प्रवेश रद्द करणे, 
 
नवीन विद्यार्थी नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग एक भरणे : २७ जून ते ३ जुलै
 
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ : ३ जुलै
प रिक्त जागा प्रदर्शित करणे, पुढील फेरीसाठी कॅप ऑप्शन्स, पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविणे आणि भाग दोन लॉक करणे, विद्यमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना भाग एक एडिट करता येण्याच्या प्रक्रियेस सुरवात : ४ जुलै

Related Articles