पन्नास लाख दिल्यानंतरही हुंड्यासाठी पत्नीच्या हत्येचा प्रयत्न   

पुणे : लग्नासाठी २५ लाखांचा खर्च केल्यानंतर वेळोवेळी केलेल्या मागणीमुळे ५० लाख रूपये मुलीच्या आई-वडीलांनी दिले. मात्र, एवढे पैसे दिल्यानंतरही पैशांची हाव आणखी वाढल्यामुळे पत्नीला वेळोवेळी मारहाण करून तिला सदनिकेच्या गॅलरीतून ढकलून देऊन हत्येचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकून सुरक्षारक्षकाने तिला वाचवल्यामुळे तिचा जीव वाचला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सहा जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तिला तिच्या वडीलांनी वेळीच घरी नेल्यामुळे तिचा जीव वाचला.
 
वडगाव शेरी येथील सिलकॉन बे या सोसायटीमध्ये ऑक्टोबर २०२३ पासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी २४ वर्षांच्या विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, पती प्रणिल निकुडे (वय-३२), सासरे उदय निकुडे (वय-६०), सासु वैशाली निकुडे (वय-५५), दीर प्रतिक निकुडे (वय-३०, सर्व रा. सिलिकॉन बे, वडगाव शेरी), दीर प्रमोद माणिक निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) चुलत सासरे माणिक जगन्नाथ निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 
तक्रारदार यांचे पती उदय निकुडे याचा फ्रोजन फुडचा व्यवसाय आहे. तक्रारदार आणि उदय यांचा विवाह दोन्ही कुटुंबाच्या ओळखीने ७ एप्रिल २०२३ रोजी लावण्यात आला. वडिलांनी साडेसात लाख रुपये रोख, सर्व संसारोपयोगी वस्तू, सोन्याची अंगठी देऊन एकूण २५ लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. सुरुवातीला सहा महिने व्यवस्थित गेले. त्यानंतर ते वडगाव शेरीतील सिलिकॉन बे या सोसायटीत राहायला आले.
 
दरम्यान, तक्रारदार यांनी रिक्षासाठी पैसे मागितल्यामुळे ८ एप्रिल २०२४ रोजी उदय याने त्यांना मारहाण केली. त्यावेळी, त्यांच्या छातीला सुज आली होती. परंतु, रूग्णालयात नेल्यावर पोलीस तक्रार होईल, या भितीने त्यांनी तक्रारदार यांना रूग्णालयात नेले नाही. तसेच, माझ्या मुलाचे नाव पोलिसांना सांगितले तर तुझ्याकडे बघुन घेईन, अशी सासर्‍यांनी धमकी दिली. त्यानंतर घरात सतत पती, सासु, सासरे, दीर हे शिवीगाळ करुन मारहाण करत तिच्या आईवडिलांना घाणघाण शिव्या देत असत. तिने सुरुवातीला आईवडिलांना सांगितले नाही.
 
असह्य झाल्यावर एक वर्षांनी तिने आईवडिलांना सांगितले. तिचा संसार वाचावा, म्हणून तिच्या वडिलांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन सासरकडील लोकांना वेळोवेळी ५० लाख रुपये दिले. परंतु, त्यांच्यात काहीच फरक पडला नाही. तिचा दीर सतत आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत होता. पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर तिचे चुलत सासरे, माणिक निकुडे व त्यांचा मुलगा प्रमोद निकुडे हे त्यांच्या घरी येऊन तिलाच शिवीगाळ करत असे.
 
दरम्यान, तक्रारदार या शुक्रवारी ऑनलाईन ऑर्डर करत असताना, तू ऑर्डर करू नको, मी करतो, या कारणावरून उदय याने भांडणे काढली. त्यानंतर, तिला शिवीगाळ करून तिचे डोके कपाटावर आपटले. तसेच, केस उपटून मारहाण केली. त्यानंतर उदय याने त्यांना ओढत गॅलरीत नेेले. तेथून ढकलून देण्याचा प्रयत्न केला.  तिने आरडा ओरडा केला. तो आवाज ऐकून सोसायटीचा सुरक्षारक्षक व सोसायटीतील लोकांनी खालून आवाज दिला. सुरक्षारक्षक धावत वर आले. त्यांनी तेथे येऊन तिला वाचवले. सुरक्षारक्षकानेे फोन लावून तिच्या वडिलांना बोलावून घेतले. ते रात्री सव्वा बारा वाजता आले आणि आपल्या मुलीला घरी घेऊन गेले. पोलिसांना कुणकुण लागल्याचे समजताच, संपूर्ण निकुडे कुटुंबीय घरातून पसार झाले. 

Related Articles