शिरुर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार कधी?   

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर- चंदननगर या रस्त्यावरील वाहतुककोंडी नित्याचीच झाली असून, ही वाहतूककोंडी सुटणार कधी, असा सवाल स्थानिक नागरिकांसह प्रवाशी व वाहनचालक यांनी उपस्थित केला आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरील कारेगाव, रांजणगाव गणपती, कोंढापुरी, कासारी फाटा, मलठण फाटा, शिक्रापूर येथील पाबळ चौक, चाकण चौक,सणसवाडी व कोरेगाव भीमा या प्रमुख ठिकाणी वाहतूककोंडीचा प्रश्न दररोज भेडसावतो आहे, परंतु त्यावर तोडगा काढण्यात प्रशासन, राजकीय नेते व पोलिस खात्याला अपयश आले आहे.
 
गेल्या आठवड्यापासून दररोज होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांसह वाहनचालकांचा जीव मेटकुटीला आला आहे.शिरुर-पुणे महामार्गावरील कारेगाव ते चंदननगर या दरम्यान दररोज होत असलेली सततची वाहतूककोंडी या रस्त्यावर गावागावांत पडलेले जीवघेणे खड्डे, अपुरे रस्ते, अवैध वाहतूक करणार्‍या रिक्षा व मालमोटारी प्रवासी वाहनांची रस्त्यावरच होत असलेली बेशिस्त पार्किंग, बेदरकार वाहनचालक व प्रशासनाची सुरु असलेली गळचेपी भूमिका यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे.
 
या महामार्गावरील शिक्रापूर -कारेगाव या दरम्यान मालमोटार, स्कुल बस, कंटेनर व मालवाहतूक वाहने बंद पडण्याचे प्रकार मोठया प्रमाणात वाढल्याने दररोज सकाळी शिरुरहुन पुण्याकडे जाणार्‍या रस्त्यावर कारेगावजवळ तीन ते चार किलोमीटरपर्यंत आणि नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर रांजणगाव गणपतीच्या पाठीमागे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने या वाहतूककोंडीचा शाळेत जाणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी, शासकीय कर्मचारी व कंपनी कामगार यांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे चाललेल्या पालखी सोहळ्यांमुळे सोलापूरहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-केडगाववरुन न्हावरेमार्गे रांजणगाव गणपती व कारेगाव अशी वळविण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून तर या रस्त्यावर प्रचंड वाहतुककोंडी झाल्याचे दिसून येत आहे. 
 

Related Articles