तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप   

पुणे : दुचाकीचा अपघात झाल्याची बतावणी करुन तरुणाकडे दोन हजार रुपयांची मागणी करुन त्याचा तळजाई परिसरात खून करणार्‍या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला. 
 
सुमीत उर्फ सोन्या सुधीर काळे (वय २१, रा. रविवार पेठ) आणि अक्षय उर्फ भीमा बाळू दिवटे (वय २२, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. रामअवतार बनवारीलाल जाटव (वय १९, मूळ रा. मध्य प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.रामअवतार पुण्यात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. १८ मार्च २०१७ रोजी आरोपी काळे आणि दिवटे दुचाकीवरुन मार्केट यार्ड परिसरात निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार रामअवतार याची दुचाकी आडवी आल्याने आरोपी काळे आणि दिवटे हे दुुचाकीवरुन पडले. त्यानंतर आरोपींनी रामअवतारला धमकावून दुचाकीवरुन धनकवडीतील वनशिववस्ती परिसरात नेले. 
 
दोघांनी रामअवतारला डांबून ठेवले. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. दुचाकीची नुकसान भरपाई द्या, असे सांगून रामअवतारच्या नातेवाईकांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. नातेवाईकांनी पैसे न दिल्याने आरोपी चिडले. त्यांनी रामअवतारचा दोरीने गळा आवळून खून केला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी काळे आणि दिवटे तेथून पसार झाले. सहकारनगर पोलिसांनी तपास करुन आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली.

Related Articles