वाघीण आणि चार छाव्यांची हत्या करणारे तिघे अटकेत   

कर्नाटकातील विषप्रयोगाची घटना उघडकीस

चामराजनगर : कर्नाटकात वाघीण आणि तिच्या चार छाव्यांवर विषप्रयोग करुन ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली. त्यांनी एका मृत गाईवर विषारी द्रव पसरवून ती खाण्यासासाठी ठेवली होती. ती खाल्यानंतर या वन्यजीवांचा दुदैवी मृत्यू झाला होता.
 
अटक केलेल्या तिघांमध्ये गाईच्या मालकाचाही समावेश आहे. माले महादेश्वरा पर्वत रांगातील हुगयाम जंगलात वाघिणीचा बदला घेण्यासाठी तिघांंनी विषप्रयोगाचे कारस्थान रचले होते. वाघिणीचा मृतदेह गुरुवारी सापडला होता. तपासात तिचा मृत्यू विषामुळे झाल्याचे उघड झाले. गाय कोणाची होती ? याचा शोध घेतला तेव्हा ती मद्दा ऊर्फ मद्दुराजू याची असल्याचे उघड झाले. वन अधिकार्‍यांनी सांगितले की, मुद्दुराजू याने त्याची केंची नावाची गाय वन्य जीवांच्या हल्ल्यात ठार झाल्याची तक्रार दिली होती. यानंतर त्याने बदला घेण्यासाठी मित्र कोनप्पा आणि नागराजू यांच्या मदतीने मृत गायीवर विषारी द्रव फवारले. गाईचे मांस खाल्ल्याने प्रथम वाघिणीचा मृत्यू झाला. नंतर तिघांनी तिच्या चार छाव्यांना विषारी मांस खायला दिले होते.. प्रारंभी मुद्दराजूच्या वडिलांनी हत्याकांडाला आपण जबाबदार असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मुद्दुराजू हाच प्रमुख संशयित असल्याचे उघड झाले. 
 
या घटनेचे राजकीय पडसाद कर्नाटकात तातडीने उमटले आहेत. वन्य जीवांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका  प्रमुख विरोधी पक्ष भाजपने केली आहे. हा प्रकार निष्काळजीपणाचा असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून वन मंत्री ईश्वर खांडरे यांनी देखील कोणालाही मोकळे सोडले जाणार नसल्याचा इशारा दिला.  दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सांगितले की, मध्य प्रदेशानंतर कर्नाटक हे वाघांचे देशातील दुसरे आश्रयस्थान असून तेथे ५६३ वाघ आहेत.

Related Articles