तेलंगणात भाजपला धक्का   

आमदार राजा सिंह यांचा पक्षाला रामराम

हैदराबाद : तेलंगणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिंह हे गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आपला राजीनामा केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे पाठविला आहे. 
 
या राजीनाम्यामागे प्रदेशाध्यक्ष पद मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी एन. रामचंद्र राव यांच्या नावावर पक्षश्रेष्ठांनी शिक्कामोर्तब केल्याने टी. राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सध्या हे पद जी. किशन रेड्डी यांच्याकडे आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. राजा सिंह यांनी रेड्डी यांना पाठविलेल्या पत्रात पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या संभाव्य निवडीचा निर्णय केवळ माझ्यासाठीच नव्हे तर लाखो कार्यकर्ते, नेते आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेल्या मतदारांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक आहे. राज्यात अनेक सक्षम ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदार आहेत. ज्यांनी पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेतले आहेत. पक्षाला पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे ताकद, विश्वासार्हता आहे. दुर्दैवाने, काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थासाठी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल केली, असा आरोप केला. 

Related Articles