पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामासाठी १६२ झाडांवर कुर्‍हाड   

झाडे तोडण्यासंदर्भात मेट्रोचा पालिकेकडे प्रस्ताव

पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो ट्रॅकला अडथळा ठरणारी १७ झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेने यापूर्वी दिली असतानाच, चार मेट्रो स्टेशनला अडथळा ठरणारी तब्बल १६२ झाडे तोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव महामेट्रोने महापालिकेच्या उद्यान विभागाला सादर केला आहे. मेट्रोच्या कामामुळे झाडांवर कुर्‍हाड कोसळणार असल्याने वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त  करण्यात येत आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी या साडेसात किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत आहे. पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी ही सहा मेट्रो स्टेशन्स आहेत. या मार्गावर काम करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. असे असतानाच, आता दुसर्‍या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५ किलोमीटर अंतर मेट्रो मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी ९१० कोटी १८ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.
 
या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डीत खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प, अशी चार स्टेशन्स करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रेडसेपरेटरच्या सर्व्हिस रस्त्यावर काम करण्यात येत आहे. या मार्गिकेसाठी निगडी येथील अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच मेट्रो ट्रॅकला अडथळा ठरणारी १७ झाडे तोडण्याची परवानगी यापूर्वीच महामेट्रो प्रशासनाने पालिकेकडून घेतली आहे.
 
त्यानंतर आता स्टेशन उभारण्यासाठी अडथळा ठरणार्‍या चिंचवड स्टेशनसह या मार्गावरील १६२ झाडे तोडण्यासाठी महामेट्रो प्रशासनाने पालिकेच्या उद्यान विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे या १६२ झाडांवर कुर्‍हाड पडण्याची शक्यता असून, वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच पर्यावरणाची हानी न करता मेट्रोने काम करावे, अशी मागणीही केली जात आहे.
 
पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गिका आणि स्टेशनसाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करणे योग्य नाही. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. झाडे न तोडता मेट्रोने काम करावे. 
 
- सचिन काळभोर, सामाजिक कार्यकर्ते

Related Articles