वैभव सुर्यवंशीचा जोरदार सराव   

लंडन : गिल, पंत, राहुल, यशस्वी या भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी इंग्लंडच्या भूमीवर आपली ताकद दाखवून दिली. पहिल्याच कसोटी सामन्यात या चौघांनीही दमदार शतके झळकावली. त्यापाठोपाठ आता इंग्लंडमध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही धमाका पाहायला मिळतो. वैभव सूर्यवंशी भारताच्या १९ वर्षाखालील संघासोबत मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. वैभव सूर्यवंशीला त्याचा चौथा सामना खेळायचा आहे, जिथे भारतीय संघाने एकही सामना जिंकलेला नाही. पण त्याआधी वैभव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने दमदार सराव केला आहे.
 
भारताचा १९ वर्षांखालील संघ २७ जून रोजी इंग्लंडमधील होव्ह ग्राउंडवर पहिला सामना खेळणार आहे. वैभव सूर्यवंशीच्या १९ वर्षांखालील कारकिर्दीतील हा चौथा एकदिवसाचा सामना असेल. यापूर्वी त्याने खेळलेल्या १९ वर्षांखालील ३ एकदिवसाच्या सामन्यांमध्ये त्याने ५ षटकार आणि ९ चौकारांसह ७७ धावा केल्या आहेत. 
 
पहिल्या १९ वर्षांखालील ३ सामन्यांमध्ये वैभवच्या नावावर केवळ एकच अर्धशतक आहे. पण सध्याच्या इंग्लंड दौर्‍यावर तो नवे विक्रम प्रस्थापित करू शकतो.वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौर्‍यासाठी तीन खास बॅट देण्यात आल्या आहेत. त्याच्या बॅटबद्दल जी माहिती उपलब्ध आहे, त्यावरून असा अंदाज लावला जातो की, प्रत्येक बॅटची किंमत ही किमान एक ते दीड लाखांच्या घरात असेल. याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण या बॅट्सचे एक खास वैशिष्ट्य आहे. वैभव सूर्यवंशीच्या तीनही नवीन बॅट डड कंपनीच्या आहेत. वैभव सूर्यवंशीचा डड बॅटशी करार आयपीएल २०२५ दरम्यान झाला.
 
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालेल्या तीन बॅटची स्वतःची एक खासियत आहे. या तिन्ही बॅटवर वैभवचे नावदेखील लिहिलेले आहे. वैभव पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर खेळणार आहे. अशा वेळी तो नव्या बॅट काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related Articles