राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या   

४२७ पोलिसांचा मृत्यू

विजय चव्हाण

मुंबई : राज्यात अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून, यामध्ये २५ आत्महत्यांचा समावेश आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच, राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक पोलिस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचार्‍यांशी संवाद साधावा लागणार आहे. आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला, याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
 
राज्य सरकारच्या 150 दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे ‘मिशन मोड’वर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा, गृहनिर्माण, आरोग्य, मानसिक आरोग्य व इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, संजय खोडके, भाई जगताप, बंटी पाटील या सदस्यांनीही सहभाग घेतला. पोलिसांच्या ड्यूटीसंदर्भात फडणवीस यांनी सांगितले की, सर्वप्रथम मुंबईतच 8 तासांची ड्यूटी ही संकल्पना लागू करण्यात आली. काही वेळा सण-उत्सव किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात. तरीही एकूणच पोलिसांची ८ तासाची ड्यूटी आता स्थिर झाली आहे. 
 

Related Articles