विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले   

विधी महाविद्यालयातील घटना; तिघांना अटक

कोलकाता : कोलकाता पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराने हादरून गेले आहे. येथील विधी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीवर तिघांनी अत्याचार केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अलीपूर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.न्यायिक दंडाधिकार्‍यांसमोर   पीडितेचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. मागील वर्षी आर. जी. कार महाविद्यालयात एका परिचारिकेवर अत्याचार झाला होता. त्यानंतर, देशात संतापाची लाट उसळली होती.
 
मोनोजित मिश्रा (३१), जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) अशी आरोपींची नावे आहेत. मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. तो माजी विद्यार्थी असून, अन्य दोन याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मिश्रा महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याची नेमणूक हंगामी होती. तो तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेचा माजी अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या दक्षिण कोलकाता शाखेचा संघटनात्मक सचिव आहे. याशिवाय, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी त्याचे संबंध होते. ही घटना २५ जून रोजी सायंकाळी घडली. संबंधित विद्यार्थिनी फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. त्यावेळी तिघांनी तिला महाविद्यालय परिसरातील एका खोलीत नेले आणि तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडित विद्यार्थिनीने कसबा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून, गुरूवारी सायंकाळी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळ सीलबंद केले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ लवकरच पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी दाखल होतील, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
आरोपींनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तसेच, या घटनेची वाच्यता केल्यास चित्रीकरण इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल जप्त केले असून फॉरेन्सिक चाचण्यांसाठी पाठविले आहेत. हे चित्रीकरण अन्य कोणत्या नंबरवर पाठविण्यात आले आहे का? हेही पोलिस तपासत आहेत.
 
या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून, आयोगाने कोलकाता पोलिसांना तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या संदर्भात कोलकाता पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या प्रकरणाची तात्काळ चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
 

 

Related Articles