यशस्वी जैस्वालने सोडले चार झेल   

लीड्स : हेडिंग्लेच्या मैदानात भारतीय सघाने दिलेल्या ३७१ धावांचा पाठलाग करताना बेन डकेट आणि झॅक क्रॉउली या जोडीनं मैदानात तग धरून जबरदस्त फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटी सामन्यातील निर्णायक दिवसाच्या खेळात इंग्लंडची सलामी जोडी जमली अन् टीम इंडियाचे टेन्शन वाढले. हे टेन्शन कमी करण्यासाठी  सिराजनं एक संधी निर्माण केली. पण यशस्वी जैस्वालनं पुन्हा घोळ घातला अन् जोडी फोडण्याची संधी हुकली. इंग्लंडच्या दुसर्‍या डावातील ३९ व्या षटकात सलामीवीर बेन डकेटला सिराजनं आपल्या जाळ्यात अडकवलेच होते, पण यशस्वी जैस्वालनं पुन्हा कॅच सोडला. कॅच सुटल्यावर एकेरी धाव घेत बेन डकेट ९८ धावांवर पोहचला अन् पुढच्या षटकात चौकार मारून त्याने कसोटी कारकिर्दीतील आपले सहावे शतकही पूर्ण केले. कॅच सुटला त्यावेळी इंग्लंडच्या सलामी जोडीनं पहिल्या बळीसाठी १६८ धावांची दमदार भागीदारी रचली होती. बेन डकेटच्या शतकाशिवाय क्रॉउलीनं अर्धशतकी खेळीसह मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल याने तीन झेल सोडले होते. यामुळे इंग्लडंविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली. त्यात आता दुसर्‍या डावातही यशस्वी जैस्वाल याने आणखी एक झेल सोडला.

Related Articles