आगाऊ आरक्षण करणार्‍या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत   

प्रवाशांना आजपासून लाभ घेता येणार 

पुणे : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणार्‍या पूर्ण तिकीटधारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात आज (मंगळवार) पासून होणार आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
 
१ जूनला एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणार्‍या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
 
मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई या मार्गावर धावणार्‍या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणार्‍या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणार्‍या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना तिकीट दरात १५ टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते. असे एसटी प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 
 
आषाढी एकादशी, गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ
 
येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणार्‍या प्रवाशांना या योजनेचा लाभ  घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणार्‍या नियमित बसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत आज (मंगळवार) पासून मिळणार आहे. तसेच जादा बससाठी ही सवलत लागू असणार नाही. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकेल. असेही एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

Related Articles