हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे पूरस्थिती   

धर्मशालामध्ये दोघांचा मृत्यू; ११ जण बेपत्ता

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सूनने पश्चिम हिमालयीन भागांत रौद्र रूप धारण केले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचलच्या कुलू आणि धर्मशाला जिल्ह्यांमध्ये पाच ठिकाणी ढगफुटी झाल्यानंतर आलेल्या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण बेपत्ता आहेत. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रा मार्गावर जमीन खचली आहे. चीन सीमेला जोडणार्‍या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जम्मूच्या कटरा येथील माता वैष्णोदेवी धाम यात्रा मार्गावरील हिमकोटी येथे दरड कोसळल्याने वाहतूक १० तास बंद होती.

ढगफुटीमुळे हाहाकार

हिमाचल प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळाबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. कुलू जिल्ह्यातील सैंज, गडसा, मनाली आणि बंजारच्या विविध भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. सैंजच्या रैला बिहालमध्ये ढगफुटीमुळे तीन जण वाहून गेले आहेत. धर्मशालाच्या खनियारा येथील मनूणी खड्ड्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाचे १० हून अधिक मजूर वाहून गेले आहेत. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एसडीआरएफची पथके घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. सैंज खोर्‍यात वेगवेगळ्या ठिकाणी १५० हून अधिक वाहनांसह दोन हजारहून अधिक पर्यटक अडकले आहेत. सिउंडजवळ रस्ता खराब झाल्याने त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग नाही. लाहौलमध्येही २५ पर्यटक अडकले आहेत.

पाच जिल्ह्यांत पुराचा इशारा

सिमल्याच्या हवामान विभागाने हिमाचलच्या अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. २ जुलैपर्यंत बहुतांश भागांत हवामान असेच राहील. हवामान खात्याने चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर या पाच जिल्ह्यांतील काही भागांत पूर इशारा देण्यात आला आहे. २६ आणि २७ जून रोजी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. २८ जून ते २ जुलैपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तराखंडला पुराचा धोका

भूविज्ञान मंत्रालयाने उत्तराखंडच्या आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह पुराचा इशारा दिला आहे. टिहरी गढवाल, पौडी गढवाल, डेहराडून, नैनिताल, चंपावत, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ येथे पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित जिल्ह्यांना सूचना पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने डेहराडून, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि नैनितालमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तराखंडच्या इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 

Related Articles