पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात लवकरच   

प्रशासनाचा सुविधांवर भर 

पुणे : पीएमपी बसमधील प्रवाशांना पुढचा थांबा कोणता हे जाणण्यासाठी चालत्या बसच्या खिडकीतून डोकावण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात करण्यात आली आहे. येत्या एक ते दीड महिन्यांत ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. 
 
पीएमपी प्रसासन सर्व बसमध्ये ’प्रवासी माहिती प्रणाली’ (पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम) कार्यान्वित करणार आहे. भाडेतत्वावरील सुमारे १ हजार २०० बसमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली आहे. स्वत:च्या मालकीच्या ४५० बसमध्ये मात्र ही प्रणाली पीएमपीला अद्याप बसवता आलेली नाही. पीएमपी प्रशासनाचा गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना अधिकच्या व चांगल्या सुविधा देण्यावर भर आहे. याचाच एक भाग म्हणून ही प्रणाली सुरू केली जाईल. त्यामुळे प्रवाशांना बस मार्गाबाबत थेट, अचूक आणि रिअल टाइम माहिती मिळेल. सध्याचा थांबा, पुढील थांबा कोणता व तेथे बस पोचण्याची अंदाजे वेळ, विलंबाची माहिती आणि अंतिम थांबा, अशी अद्ययावत माहिती डिजिटल फलकावर मिळेल. याशिवायही ही माहिती बसमधील ध्वनिवर्धकावरूनही देण्यात येईल. 
 
असा होणार प्रवाशांना फायदा  
 
प्रवाशांना थांबा आणि वेळेची अचूक माहिती मिळणार
प्रवासाचे नियोजन सुलभ होणार
बसमधील उद्घोषणामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त
वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यास मदत
 
सद्या भाडेतत्वारील बसमध्ये ही प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. ध्वनिवर्धकाच्या बाबतीत अडचण निर्माण झाल्याने ही प्रणाली कार्यान्वित करण्यास उशीर झाला आहे. महिन्याभरात सर्व बसमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल. 
 
- नितीन नार्वेकर,सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

Related Articles