सातत्यपूर्ण विकासाच्या यादीत भारताचा ९९ वा क्रमांक   

नवी दिल्ली : सातत्यपूर्ण विकासात भारताने मोठी झेप गेल्या काही वर्षांत घेतली आहे. १०० देशांच्या यादीत भारताने स्थान पटकविण्याचा मान मिळविला आहे. या संदर्भातील यादी मंगळवारी प्रकाशित करण्यात आली. यादीत भारताचा क्रमांक ९९ वा असल्याचे उघड झाले. 
 
संयुक्त राष्ट्राच्या सातत्यपूर्ण विकास समाधान जाळ्याने दहावा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यासंदर्भातील यादीत ६७ गुण मिळवून भारताने ९९ वे स्थान पटकाविले आहे. चीन भारताच्या पुढे असून त्याने ७४.४ गुण मिळवत ४९ वे स्थान तर अमेरिकेने ७५.२ गुण मिळवत ४४ वे स्थान मिळविले. सातत्यपूर्ण विकासात भारताचा आलेख हा २०१७ नंतर उंचावत गेला आहे. तेव्हा त्याचा क्रमांक ११६ वा होता. त्यानंतर २०१८ ते २०२४ या काळात त्याने निरंतर प्रगती केली. २०१८ मध्ये ११२ व्या क्रमांकावर भारत होता. २०२४ अखेर तो १०९ व्या क्रमांकावर पोहोचला आणि २०२५ मध्ये त्याने १०० देशांच्या यादीत स्थान मिळविले. अन्य देशांत भूतानचे स्थान ७४ वे, नेपाळचे ८५ वे, बांगलादेश ११४ व्या स्थानावर आणि पाकिस्तान १४० व्या स्थानावर आहे. समुद्रातील शेजारी देश मालदीव अणि श्रीलंका यांनी यादीत ५३ वे आणि ९३ वे स्थान पटकावले. 
 
सर्वच देशाची सर्वागीण प्रगती  २०३० पर्यंत व्हावी, हे संयुक्त राष्ट्राच्या सातत्यपर्ण विकास समाधान जाळ्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विकासाचे शून्य ते १०० असे मापदंड ठरविण्यात आले. १०० हा आकडा विकासाची १७ उद्दिष्टे गाठणार आणि शून्य म्हणजे काहीच विकास नाही, असे मानले गेले.  दरम्यान, यादीत पहिला क्रमांक फिनलँडचा आहे. त्या पाठोपाठ स्वीडनचा दुसरा आणि डोन्मार्कचा तिसरा आहे. युरोपातील एकूण २० पैकी १९ देश १०० देशांच्या यादीत आहेत. मात्र, त्यांना दोन प्रमुख उद्दिष्टे गाठावी लागणार आहेत. त्यामध्ये वातावरण आणि जैवविविधतेचा समावेश आहे. कारण ते त्याचा अनिर्बध वापर करतात, असे अभ्यासकांचे मत आहे. 
 

Related Articles