३७ तास न थांबता प्रवास करणारे B-2 नेमके काय आहे ?   

इराणवर बॉम्बफेक करणाऱ्या B-2ची किंमत किती

वॉशिंग्टन : इराण-इस्रायल यांच्यात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या संघर्षात उडी घेत इराणच्या अण्वस्त्र तळांवर 'बी २' बॉम्बर विमानांनी हल्ले चढवले. या विमानांनी बंकर बस्टर बॉम्ब टाकले. इराणच्या भूमिगत अण्वस्त्र तळांना अमेरिकेने लक्ष्य केले. या धाडसी कारवाईला अमेरिकेने 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' असे नाव दिले होते. या हल्ल्याची माहिती अमेरिकेचा संरक्षण विभाग पँटागॉनने दिली.
 
अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी अमेरिकेवरुन उड्डाण करत इराणवर हल्ला केला. या प्रवासात त्यांनी बऱ्याचदा इंधन भरले. पण ही विमाने एकदाही थांबली नाहीत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर ती थेट अमेरिकेत परतली. ही संपूर्ण कारवाई ३७ तास चालली. इतका वेळ बी-२ चे वैमानिक इतक्या लहानशा कॉकपिटमध्ये कसे राहिले, असा प्रश्न अनेकांना पडला.
 
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, फोर्डो अण्वस्त्र केंद्रावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बी-२ स्टिल्थ बॉम्बर विमानांमध्ये शौचालये, मायक्रोव्हेव, स्नॅक्स कूलर यासारख्या सोयी असतात. मिसौरीहून इराणला जाऊन हल्ला करुन परतीचा प्रवास करण्यासाठी ३७ तासांचा कालावधी लागला. या ३७ तासांमध्ये पायलट्सना कोणताही त्रास झाला नाही. बी-२ बॉम्बरची रचना प्रामुख्यानं सोव्हियत रशियावर अणू बॉम्ब टाकण्यासाठी केली गेली होती. रशियाला लक्ष्य करण्यासाठी तयार केलेली लढाऊ विमाने इराणवरील कारवाईसाठी वापरण्यात आली.
 
अमेरिकन बॉम्बर विमानांची तुकडी शुक्रवारी कॅनसस शहराबाहेर असलेल्या व्हाईटमॅन हवाई तळावरुन रवाना झाली. त्यांनी या प्रवासात अनेकदा इंधन भरले. प्रदिर्घ काळ चालणारा विमान प्रवास सुखकर व्हावा यासाठी बॉम्बर विमानांच्या कॉकपिटमध्ये छोटा रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह असतात. त्यामुळे वैमानिकांना जेवण, नाश्ता मिळत राहतो.
 
दिर्घकाळ उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्य कोणत्याही विमानांप्रमाणेच बी-२ स्पिरिटमध्ये शौचालयदेखील असते. एक वैमानिक झोपून आराम करु शकेल, इतकी जागा त्यात असते. त्यावेळी दुसरा वैमानिक विमान उडवत असतो. बी-२ विमान १९९७ मध्ये पहिल्यांदा आकाशात झेपावले. या विमानाची किंमत २ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. २००८ मध्ये एका अपघातात अमेरिकेचे एक बॉम्बर कोसळले. सध्याच्या घडीला अमेरिकेकडे १९ बॉम्बर विमाने आहेत.

Related Articles