ग्रामपंचायत स्तरावर स्थापणार हवामान केंद्र   

कृषी विभागाचा निर्णय 

पुरुषोत्तम मुसळे
 
भोर : शेतकर्‍यांना हवामान विषयक अचूक माहिती प्राप्त व्हावी, हवामानाधारीत कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन प्राप्त व्हावे. कृषी हवामान क्षेत्रात संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक आवश्यक ती माहिती प्राप्त व्हावी. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या व्हेदर इन्फर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम प्रकल्पाअंर्गत ग्रामपंचायत स्तरावर ‘स्वयंचलित’ हवामान केंद्र स्थापनाचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. 
 
चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षाव) ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत होणार्‍या नागरिकांना मदत अपेक्षित आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारल्यास चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षाव) ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीची माहीती ग्रामंपचायत स्तरावर मिळण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरतील. स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग, दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. या केंद्रामार्फत प्राप्त होणारी माहिती, विश्लेेषण शेतकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शनासाठी उपयुक्त होणार आहे. त्यानुसार महावेध प्रकल्पाअंतर्गत राज्यातील महसूल मंडळ स्तरावरील गावातून स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी यापूर्वी केली आहे. 
 
या केंद्रातून उपलब्ध होणारी माहिती संबंधित गावापुरती मर्यादित असते. मात्र, महसूल विभागाकडील माहिती इतर गावातील हवामान विषयक माहिती भिन्न असण्याची मोठ्या प्रमाणांवर शक्यता असते. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर केंद्राची स्थापना केल्यास हवामानविषयक ग्रामपंचायत निहाय विशिष्ट माहिती प्राप्त होईल.सध्या ज्या महसूल विभागात स्वयंचलित हवामान केंद्र उभारली आहेत, ती गावे वगळून उर्वरित ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यानुसार स्थानिक भौगोलिक आकार आणि महसुली विभाग विचारात घेऊन हवामान केंद्र उभारणीत सुसूत्रता आणि सनियंत्रण या दृष्टीने प्रत्येकी दोन अथवा तीन महसुली विभागाकरिता एक या प्रमाणे सर्व महसुली विभागाकरिता केंद्रांची निवड करावी. या केंद्राची देखभाल दुरूस्ती, नियमित तपासणी, यंत्रात काही बिघाड किंवा नुकसान झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना त्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचार्‍याने द्यावी. केंद्र उभारण्याची जागा तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, इतर निमंत्रित सदस्यांची समिती हवामान केंद्रांवर देखरेख राहील आदी बाबी स्पष्ट केल्या आहेत.  
 
मागील काही वर्षांत हवामानातील अनिश्चितता व अस्थिरतेमुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे आढळते. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, तापमानातील चढ-उतार परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अलीकडे बहुतेक शेतकर्‍यांचा शेतीमध्ये स्मार्ट प्रयोग करण्याचा कल आहे. त्यामुळे हवामानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत गरजेची आहे. त्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र ही गरज झाली आहे. स्वयंचलित हवामान केंद्र हे संवेदक, डेटा लागरच्या साहाय्याने हवामानाच्या विवध घटकांचे सतत निरीक्षण करणारे एक उपकरण आहे. त्याद्वारे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वार्‍याचा वेग आणि दिशा, वायुदाब, मातीतील ओलावा, तापमान आदी माहिती मिळते. हवामानाचा अचूक असा अंदाज मिळाल्यास शेतकरी पेरणी, पाणी व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन, औषध फवारणी, पिक कापणीसाठी योग्य वेळ निवडू शकतो. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होईल. पूर, दुष्काळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या जोखमीचा अंदाज घेउन तो प्रतिबंधात्मक उपाय योजना करू शकेल. सध्या जिल्ह्यात सुमारे शंभर मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या अहवालात आहे.

Related Articles