जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती   

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतिबंध तयार करून तो अर्थ विभागाकडे सादर करण्यात आला होता. या सर्व पदांना आता उच्च समितीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदारीत्या राबविली जाईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य डॉ. प्रज्ञा सातव, अभिजित वंजारी, अनिल परब यांनी या संदर्भातील लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.मंत्री राठोड म्हणाले, की २०१७ मध्ये जलसंधारण विभागाची स्वतंत्र निर्मिती झाली. त्यावेळी १६,४९९ पदांचा आकृतिबंध मंजूर झाला होता. त्यातील ९,९६७ पदे कृषी विभागाकडून आणि ६,५१२ पदे जलसंपदा व ग्रामविकास विभागाकडून वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, कृषी विभागाकडून केवळ २,१८१ पदांचीच मंजुरी मिळाली. या नव्या पदांच्या माध्यमातून विभागाची रचना अधिक सक्षम केली जाणार असून, छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर आयुक्तांचे नवीन कार्यालय स्थापन केले जाईल. पालघर, वर्धा, सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जिल्हा जलसंधारण अधिकार्‍यांची नवीन कार्यालये सुरू केली जातील, असेही ते म्हणाले.
 

Related Articles