आयटी कंपन्यांच्या शेअरची आपटी   

बाजाराचा निर्देशांक घसरला

मुंबई : इराणची तीन अणु केंद्रे अमेरिकेने उद्ध्वस्त केल्याचे पडसाद शेअर बाजारात सोमवारी उमटले. निर्देशांक घसरले असून माहिती तंत्रज्ञान (आयटी), तंत्रज्ञान आणि वाहनांचे समभागांचे मूल्य घसरले. खनिज तेलाचे दरही काल वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भूराजकीय गुंतागुंत आणि तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल वाढली होती. 
 
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे ५०० ने घसरला. दिवसभरात एका क्षणी तो ९०० ने घसरला होता. नंतर त्यात वाढ झाली.. बाजार बंद होताना तो ५१२ ने घसरुन ८१ हजार ८९७ वर बंद झाला. एकंदरीत दिवसभरातील व्यवहारात तो ९३१ ने घसरुन ८१ हजार ४७७ पर्यंत कमी झाला होता. मुंबई शेअर बाजारातील २ हजार २०५ समभागांचे मूल्य घसरले. तर, १ हजार ८५४ समभागांचे मूल्य वाढल्याचे दिसून आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८८ ने घसरुन तो २४ हजार ८२५ वर बंद झाला. 
 
इस्रायल आणि इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली. त्याचे परिणाम शेअर बाजारावर उमटले. गेल्या चार सत्रांत १० हजार कोटींच्या समभागांची खरेदी झाली होती. संघर्षामुळे भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले, अशी माहिती मेहता इक्विटीचे संशोधक प्रशांत तापसे यांनी दिली.एचसीएल टेक, इन्फोसिस, लार्सन अँड ट्रुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी यांच्या समभागांचे मूल्य घसरले. या उलट ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्राच्या समभागांचे मूल्य वाढले 
 
आयटीचे समभाग सरासरी १.४८ टक्के घसरले. वाहनांचे समभाग १.१० टक्के, एफएमसीजीचे ०.६२ टक्के तर, टेलिकम्युनिकेशनचे अर्धा टक्के आणि बँकेचे समभाग ०.३८ टक्के घसरले. दरम्यान, जागतिक तेल बाजारात खनिज ब्रेट तेलाचे दर वाढले आहेत. एका पिंपाचा दर ७७.३९ डॉलर एवढा होता.
 

Related Articles