जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला; शेतकरी भयग्रस्त   

बेल्हे, (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला असून दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन घडू लागल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळीव प्राणी, मेंढ्यांचे कळप यांच्यावर हल्ले वाढल्याने वन विभागाने तातडीने ’अलर्ट’ होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
 
सध्या परिसरात खरीप हंगामाच्या शेती कामांसह भाजीपाला काढणीचे काम सुरू आहे. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकर्‍यांना जीव मुठीत घेऊन शेतात काम करावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी नारायणवाडी येथील बाळासाहेब निंबाळकर यांच्या गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. तर मांजरवाडीत टोमॅटोची तोडणी करत असताना दिवसाढवळ्या शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती आहे. नारायणगावालाही बिबट्यांचा धोका जाणवू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रीन होम सोसायटीत बिबट्या शिरला होता. प्रसंगावधान राखत वॉचमनने त्याला हुसकावून लावले.
 
गेल्या १० वर्षांत बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून पोषक वातावरण तसेच खाद्य म्हणून कुत्री व कोंबड्यांची सहज उपलब्धता यामुळे ते इतरत्र न जाता स्थायिक होत आहेत. वन विभागाकडून बिबट्याला पकडून माणिकडोह निवारा केंद्रात नेले जाते, पण जागा नसल्यास त्यांना परत जंगलात सोडले जाते. अनेकवेळा ते पुन्हा मूळ परिसरात परततात. त्यामुळे नसबंदीचा पर्याय आवश्यक ठरत असल्याची मागणी शेतकर्‍यांकडून सातत्याने केली जात आहे. जुन्नर तालुक्यात ७० बिबट्यांवर नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असला तरी तो अद्यापही प्रलंबित आहे.
 
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या जागी प्रशांत खाडे यांची उपवनसंरक्षकपदी नियुक्ती झाली आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. शेतकरी वर्ग त्यांच्याकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करत आहे. अन्यथा लोकभावना तीव्र होण्याची शक्यता आहे. जुन्नर तालुक्यात मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांचे लक्ष्य त्यांच्या बकर्‍या व मेंढ्यांवर आहे. जवळपास दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे दगावत आहेत. त्यामुळे मेंढपाळांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे.
 

Related Articles