क्रांतिकारक - ठाकूर रोशनसिंह   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस

कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद

ठाकूर रोशनसिंह हे एक महान क्रांतिकारक होते. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान अंधकारात उजेड निर्माण करणारे क्रांतीचे चिन्ह होते. मातृभूमीसाठी त्याग, राष्ट्रासाठी अभिमान आणि गौरव यासाठी जीवन अर्पण करणार्‍या अशा वीर सपूतांमुळे आपण सारे त्यांचे ऋणी आहोत. काकोरी रेल्वे लूट कट खटला या घटनेत सहभागी नसतानाही शचीन्द्रनाथ संन्याल, योगेश चटर्जी आणि ठाकूर रोशनसिंह यांना गोवण्यात आले. हे तिन्ही स्वातंत्र्यसेनानी लढाऊ आणि नेतृत्व करणारे स्वातंत्र्ययोद्धे. या खटल्यामध्ये गोवण्यात आलेले शचीन्द्रनाथ संन्याल आणि योगेशचंद्र चटर्जी आधीपासूनच वेगवेगळ्या आरोपांमुळे कैदेत असल्याने हे दोघेही फाशीच्या शिक्षेपासून बचावले. शचींद्रनाथ संन्याल यांना जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा, तर योगेशचंद्र चटर्जी यांना दहा वर्षे सक्तमजुरी व ते अपिलात गेल्यानंतर उलट जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली.
 
प्रत्यक्ष काकोरी प्रकरणातील आरोपीपैकी पं. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाक उल्ला खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचबरोबर ठाकूर रोशनसिंह हे या काकोरी कटात प्रत्यक्ष सामील नसतानाही त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ७ एप्रिल १९२७ रोजी ठोठावण्यात आलेली ही फाशीची शिक्षा १९ डिसेंबर १९२७ रोजी ठाकूर रोशनसिंह यांच्यासाठी अलाहाबादच्या नैनी जेल तुरुंगात अंमलात आणण्यात आली. फाशीच्या अंमलबजावणीनंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. ठाकूर रोशनसिंह यांच्या ’झिंदाबाद’ या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला आणि तरुण पिढी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाली. ठाकूर रोशनसिंह यांचा आदर्श स्वातंत्र्यलढ्याला प्रेरक ठरला.
 
ठाकूर रोशनसिंह यांनी ६ डिसेंबर १९२७ रोजी अलाहाबादच्या नैनी जेलमधील कालकोठडीतून आपल्या एका मित्राला लिहिलेले पत्र आजही त्यांचे विचार आपली मती गुंग करतात. ते आपल्या पत्रात म्हणतात... एक आठवड्याच्या आतच मला फाशी होईल. ईश्वराची प्रार्थना आहे की, माझ्या मृत्यूसाठी तुम्ही दुःखी होऊ नका, उलट आनंदी व्हा. जगात दुष्टतेला दुष्टतेने उत्तर देऊ नका. मरण्याच्या वेळेस ईश्वराचे स्मरण करा. हीच गोष्ट मी सर्वांना सांगू इच्छितो की, ईश्वराच्या कृपेने मी फार शांत आहे. म्हणून माझा मृत्यू हा कुणाच्याही दु:खाचा किंवा शोकाचा विषय नाही. मी गेली दोन वर्षे माझ्या पत्नी आणि मुलांपासून दूर आहे. या वेळात मला ईश्वरस्मरणाचे फार लाभ झाले. त्यामुळे माझी मोह, तृष्णा आणि कोणतीही आशा राहिलेली नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की, जगाच्या कष्टमय प्रवासाची माझी अखेर असून मी आता शांतीच्या जगात प्रवेश करतो आहे. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये लिहिले आहे, जो पुरुष धर्मयुद्धात प्राण देतो, त्यालाही तीच गती मिळते, जी जंगलात तपश्चर्या करणार्‍या संतांना मिळते. पत्र संपविताना ठाकूर रोशनसिंह यांनी शेर लिहिला आहे. 

...जिंदगी जिंदा-दिली को जाने ऐ रोशन 

...वरना कितने ही यहाँ रोज फना होते है...!

या ओळी अतिशय अर्थपूर्ण आहेत. येथे जिंदगी जिंदा-दिली को जान याचा अर्थ आहे.... खरे ’जगणे’ म्हणजे जिद्द, धैर्य व प्रेरणा देणारे जीवन. वरना कितने ही यहाँ रोज फना होते है म्हणजे दररोज अनेक लोक मरतात; पण ते जीवन प्रेरक ठरत नाही. या पत्रातून ठाकूर रोशनसिंह यांची आध्यात्मिक शांतता, कणखर श्रद्धा आणि वीरमरणाचे तेज स्पष्ट दिसते. त्यांनी मृत्यूच्या छायेत सुद्धा शांतपणे विचार केला. कुटुंबाला शांततेचा सल्ला दिला आणि देशसेवेच्या कर्तव्याला पूर्ण न्याय दिला.

एक वर्षात स्वराज्य

ठाकूर रोशनसिंह यांचा जन्म २२ जानेवारी १८९२ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहापूर जिल्ह्यातील नावडा गावातील कौशल्यादेवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ठाकूर जंगीसिंह. त्यांचा पूर्ण परिवार आर्य समाजाशी निगडित होता. पाच बहीण-भावांत ते ज्येष्ठ होते. सुरुवातीच्या काळात ते विविध खेळ खेळत होते. त्यांनी शार्पशूटर आणि कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळविली होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक दलाचे क्रियाशील कार्य करीत होते. प्रथम महायुद्धाच्या सुवर्णसंधीचा काहीही उपयोग न होता शतावधी क्रांतिकारकांच्या जीवनांची आहुती पडूनही या रणयज्ञांतून स्वातंत्र्यसिंहासनाची निर्मिती होऊ शकली नाही. भारतमातेच्या पायांतील दास्यशृंखला अधिकच घट्ट झाल्या व इंग्रजी राजसत्ता विकट हास्य करीत आपली पकड अधिकच आवळू लागली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सारा भारत एका नव्या मार्गाची वाटचाल चालू लागला होता.’ लोकांच्या अंत:करणातील स्वातंत्र्याची आकांक्षा उत्कटतेने प्रज्वलीत झाली होती. गांधीजींनी प्रवर्तित केलेल्या असहकार चळवळीच्या मार्गाकडे लोक स्वाभाविकपणे आकर्षित झाले. ’एक वर्षात स्वराज्य’ ही त्यांची घोषणा तर सर्वसामान्य जनतेला दिङमूढ करणारी होती. नोव्हेंबर १९२१ मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक दलावर बंदी घातली, तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांच्या निर्णयाला विरोध केला. असहयोगातून स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने काहीही निष्पन्न होणार नसल्याचे ज्या क्रांतिकारकांना वाटले, त्यातील प्रमुख नाव म्हणजे ठाकूर रोशनसिंह. ब्रिटिश अधिकार्‍यांना विरोध करीत ठाकूर रोशनसिंह यांनी शाहजहांपूर जिल्ह्यातील काँग्रेस स्वयंसेवकांच्या गटाचे नेतृत्व बरेली प्रदेशात केले. ब्रिटिश सरकारने काँग्रेस स्वयंसेवक दलावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ मिरवणूक काढण्यात आली. ब्रिटिश भारतीय पोलिसांनी मिरवणूक संपवण्यासाठी गोळीबार सुरू केला. या गोळीबारप्रसंगी ठाकूर रोशनसिंह यांनी एका पोलिसाची रायफल हिसकावून घेत उलटा गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिसांना पळ काढावा लागला. ठाकूर रोशनसिंह यांच्यावर खटला होऊन त्यांना दोन वर्षांची शिक्षा बरेली येथे भोगावी लागली.    

दरोड्यांचा कट

१९२२ मध्ये असहकार आंदोलन महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चालू असताना ‘चौरी चौरा’ घटना घडल्याने गांधीजींनी असहकार आंदोलन थांबविले. यामुळे जहाल क्रांतिकारक गट पुन्हा नव्या उमेदीने स्वातंत्र्यलढ्यात उतरला. ठाकूर रोशनसिंह हे राजेंद्रनाथ लाहिरी, रामदुलारे त्रिवेदी व सुरेशचंद्र भट्टाचार्य यांच्यासह पं. रामप्रसाद बिस्मिल यांना भेटून नव्याने स्थापन झालेल्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत सामील झाले. ठाकूर रोशनसिंह यांच्यावर पक्षाच्या तरुण सदस्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली.
 
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेसाठी व त्यांच्या मोहिमांसाठी निधी गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रमुखांमध्ये ठाकूर रोशनसिंह यांचा समावेश होता. नुसती ज्वलजहाल पत्रके काढणे एव्हढेच या संघटनेचे उद्दिष्ट नसून ज्वलजहाल कृत्ये करणे हेही उद्दिष्ट होते. त्यासाठी शस्त्रे आवश्यक असल्याने शस्त्रसंग्रह करणे, तसेच क्रांतिकारक चळवळीत मुरलेलेच लोक संस्थेत असल्यामुळे बॉम्ब तयार करणे यासाठीही धनसंचय आवश्यक होता. नवीन शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी या संघटनेतील क्रांतिकारक कुशल होते. आवश्यक धनसंचय मिळविण्यासाठी दरोडे घालणे अनिवार्य झाल्याने ९ मार्च १९२३ रोजी बिचपूर येथे २५ डिसेंबर १९२४ रोजी बमशैली येथे, तर २४ मे १९२५ रोजी द्वारकापूर येथे संघटनेतर्फे दरोडे घालण्यात आले. यातील डिसेंबर १९२४ रोजी बमशैली येथे ठाकूर रोशनसिंह यांच्या नेतृत्वाखाली शचिंद्र बक्षी, मन्मननाथ गुप्त, पं. रामप्रसाद बिस्मिल व चंद्रशेखर आझाद यांनी सावकार बलदेव प्रसाद यांच्या घरावर दरोडा घातला. ख्रिसमसच्या दिवशी घातलेल्या या दरोड्यात ४००० रुपये तसेच सोने-चांदीच्या वस्तू त्यांना मिळाल्या; परंतु मोहनलाल पहलवान नावाच्या व्यक्तीने या दरोड्यास विरोध केल्याने ठाकुर रोशनसिंह यांच्या रायफलीमधून मारलेल्या गोळीने त्याचा मृत्यू झाला.
 
काकोरी कट यासाठी २६ सप्टेंबर १९२५ या दिवशी ठाकूर रोशनसिंह यांना अटक करण्यात आली. ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी स्टेशनजवळ जो सरकारी खजिना लुटला गेला, त्यामध्ये ३३ वर्षांचे ठाकूर रोशनसिंह सामील नव्हते; परंतु या प्रकरणात त्यांना गोवण्यात येत असतानाच बमशैली दरोड्यातील त्यांच्याविरुद्ध पुरावे आणि साक्षी मिळाल्याने ब्रिटिश पोलिसांनी ठाकूर रोशनसिंह यांना फाशी देण्यासाठी सम्राटाविरुद्ध युद्ध घोषित करणे, कट करणे, हत्या करणे, दरोडे घालणे याचा वापर केला. या खटल्यात सरकारच्या वतीने पंडित जगत नारायणलाल हे काम चालवीत होते, तर आरोपींच्या वतीने पं. गोविंदवल्लभ पंत, बी. के. चौधरी, मोहनलाल सक्सेना व चंद्रभान गुप्त हे काम चालवीत होते. या खटल्यासाठी सरकारच्या वतीने २५० साक्षीदार तपासण्यात आले आणि त्या काळात दहालक्षाहून अधिक रुपये खर्च सरकारतर्फे करण्यात आला. ब्रिटिश राजसत्ता क्रांतिकारकांविरुद्ध धसक्याने महत्त्व देऊन किती कठोर शिक्षा देत होती हे लक्षात येते. १८ जणांना विविध स्वरूपात झालेल्या शिक्षांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या साहसी व शूर देशभक्तांविषयी उत्कट आत्मीयता होती. यापैकी कोणीही स्वार्थी नसून राष्ट्रीय अपमानाचे पाप धुऊन काढण्यासाठी या साहसी तरुणांनी आपल्या जीवनाचे यातनामय हवन चालविले आहे, यासाठी सामान्य जनता स्वयंस्फूर्तेने निधी जमवून त्यांच्या नैर्बंधिक संरक्षणाची व्यवस्था करीत होती. 
 
या निकालाविरुद्ध शचींद्रनाथ संन्याल सोडून इतर सर्वांनी वरच्या न्यायालयात अपील केले. अर्थातच ते विफल होऊन पं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, आणि ठाकूर रोशनसिंह जे उत्तरप्रदेश येथील शहीदगढच्या शाहजहाँपुर येथील रहिवासी होते, त्यांना १९ डिसेंबर १९२७ रोजी फाशी देण्यात आले. फाशीच्या दिवशी अत्यंत शांतपणे ठाकुर रोशनसिंह फाशीच्या दोराला स्पर्श करीत तीन वेळा वंदे मातरम असा उद्घोष करीत ‘ओम विश्वानि देव सवितूर दुरितानि परासुव यद भद्रम तन्नासुव’ हा जप करीत फाशीवर गेले. जेलच्या बाहेर हजारो स्त्री-पुरुष, युवा अंतिम दर्शनासाठी हजर होते. मोठ्या संख्येने लोकांनी शवयात्रा काढून ‘रोशनसिंह अमर रहे’ या घोषणेने गंगा-यमुनेच्या संगमावर वैदिक पद्धतीने त्यांचे अंतिम संस्कार केले. ठाकूर रोशनसिंह हे फाशी गेले तेव्हा त्यांचे वय ३५ होते. त्यांचे लग्न झाले होते आणि मुलेही होती. पण त्यांच्या सहकारी क्रांतिकारक बिस्मिल, अशफाक आणि लाहिरी यांना फाशी देण्यात आली. ज्यांनी जीवनाचा ऐशो-आराम बघितला नव्हता, त्याबद्दल त्यांना अतिशय दुःख व यातना होत होत्या.
 
अलाहाबाद येथील नैनीस्थित मलाका जेल येथे फाशी झालेल्या ठिकाणासमोर ठाकूर रोशनसिंह यांचे स्मारक असून त्यावर अप्रतिम योगदानाचा उल्लेख आहे. त्यांच्या नावाने एक हॉस्पिटल ज्याचे नाव स्वरूपरानी हॉस्पिटल आहे ते उभे करण्यात आले आहे. त्यांच्या नावाने कॉलेजही चालविण्यात येते. दरवर्षी त्यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी करण्यात येते. त्यांची नातवंडे अभिमानाने वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चस्तरीय कामगिरी करीत आहेत. ठाकूर रोशनसिंह यांचा जीवनप्रवास स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात प्रेरणास्रोत बनून राहिला आहे. विविध घटनांद्वारे त्यांनी आपल्या चिंतनामधून ब्रिटिश राजवटीला तडाखे दिले, तसेच आचरणातून ब्रिटिश साम्राज्याला नामोहरम करण्याचे काम केले.
 

Related Articles