जागतिक तेल वाहतुकीवर आता संकट   

दत्तात्रय जाधव 

इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणच्या संसदेने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या निर्णयाला घाईघाईने मान्यता दिली आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी तेल वाहतूक मार्ग असून, २६ टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या सामुद्रध्ाुनीतून होते. इराणच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगावर इंधन तुटवड्याचे व दरवाढीचे संकट घोंघावू लागले आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनी  

सामुद्रधुनी म्हणजे दोन मोठ्या जलाशयांना जोडणारा अरुंद जलसाठा. होर्मुझ सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि हिंदी महासागरातील अरबी समुद्राला जोडते. त्यामुळे एका बाजूला इराण आणि दुसर्‍या बाजूला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती विभागले जातात. येथील निसर्गरम्य होर्मुझ बेटावरून तिला हे नाव पडले आहे. ही सामुद्रधुनी फारशी रुंद नाही. त्यामुळे सामुद्रधुनी अडवणे किंवा तिथून जाणार्‍या जहाजांवर हल्ला करणे सोपे होते. 

सामुद्रधुनी किती महत्त्वाची?

जगभरात पुरवठा केले जाणारे तेल आणि एलएनजी गॅसची जवळपास ३० टक्के वाहतूक या सामुद्रध्ाुनीतून चालते. ही सामुद्रधुनी बंद केल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी कोलमडू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढतील. गल्फ भागातल्या तेल निर्यातदारांसाठी ही सामुद्रधुनी जास्त महत्त्वाची आहे. कारण या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच तेल आणि गॅस उत्पादनावर आधारित आहे. इराणही तेल निर्यातीसाठी याच सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियापर्यंत पोहोचणारे बहुतांश कच्चे तेल याच मार्गाने येते. प्रमुख आखाती तेल उत्पादक देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी हा मुख्य निर्यात मार्ग आहे. 

महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग 

आकाराने लहान असला तरी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. या जलमार्गाची लांबी १५४ किलोमीटर आहे. सर्वात चिंचोळ्या भागामध्ये हा जलमार्ग केवळ ३३ किलोमीटर रुंद आहे. त्याच्या प्रत्येक बाजूच्या शिपींग लेन्स ३ किलोमीटर रुंद आहेत. मार्ग चिंचोळा असला तरी यातून जगातले सर्वात मोठे तेलाचे टँकर्स जातात. पश्चिम आशियामधले बहुतेक तेल आणि गॅस उत्पादक आणि त्यांचे ग्राहक या सामुद्रधुनीचा वापर करतात.

पर्यायी मार्ग आहे का?

होर्मुझच्या सामुद्रधुनीला कोणताही सागरी पर्याय नाही. लाल समुद्र किंवा ओमानच्या रस्ते मार्गाने तेल वाहतूक करणे खूप खर्चिक आहे. त्याचा परिणाम थेट संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे ही सामुद्रधुनी इराणसाठी खूप महत्त्वाची आहे. या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली, तर त्याचे परिणाम जगभरातील तेल आणि एलएनजी गॅसच्या व्यापारावर होतील आणि किमती गगनाला भिडतील. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक बंद झाल्यास याचा थेट फटका आशियातील देशांना बसणार आहे.

भारतावर काय परिणाम होईल?

या सामुद्रधुनीतून भारत दररोज सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल आयात करतो, जे भारताच्या एकूण ५.५ दशलक्ष बॅरल प्रतिदिन आयातीचा एक भाग आहे. मध्य पूर्वेतील तणावाचा धोका भारताने आधीच ओळखला असून रशिया, अमेरिका आणि ब्राझीलमधून तेल घेऊन आपले स्रोत विविधीकृत केले आहेत. हे देश होर्मुझ सामुद्रध्ाुनीतून वाहतूक करत नाहीत. त्यामुळे ही सामुद्रध्वनी इराणने बंद केली तरी भारतावर फारसा परिणाम होणार नाही.  

सामुद्रधुनीवर ताबा कोणाचा?

संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, येथील देशांना त्यांच्या किनारपट्टीपासून २२.२० किलोमीटर अंतरापर्यंत सामुद्रधुनीवर ताबा ठेवता येतो. या सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग पूर्णपणे इराण आणि ओमानच्या क्षेत्रामध्ये येतो, त्यामुळे या सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि प्रवेशाबाबत या दोन देशांकडेच अधिकार आहेत. त्यामुळे इराणकडून वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची धमकी दिली जाते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिषदेतल्या ठरावानुसार लष्करी जहाजासह इतर जहाजांना एखाद्या देशाच्या जलभागातून मार्गक्रमण करण्याचा हक्क आहे. परदेशी जहाजांचा प्रवासाचा हक्क ते हिरावून घेऊ शकत नाहीत.

यापूर्वी कधी बंद करण्यात आली होती?

८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान दोन्ही देशांनी सामुद्रधुनीतून जाणार्‍या जहाजांवर हल्ला केला होता; परंतु या मार्गावरील वाहतूक आजपर्यंत कधीही रोखली गेली नाही. आताही इराणच्या संसदेने सामुद्रधुनी बंद करण्याच्या निर्णयाला घाईघाईने मान्यता दिली असली तरी असे होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण इराणचा व्यापारही याच मार्गाने चालतो. इराणने मार्ग रोखल्यास त्याच्या मित्रराष्ट्रांवरही त्याचा परिणाम होऊन त्यांचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. 

गॅसची एक पंचमांश वाहतूक 

इराण व्यतिरिक्त, इराक, कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया हे सर्व देश परदेशात कच्चे तेल वाहून नेण्यासाठी या सामुद्रध्ाुनीवर अवलंबून आहेत. या प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये पर्यायी मार्ग कमी आहेत.  ब्लूमबर्गच्या मते, जगातील द्रवीकृत नैसर्गिक वायू या पुरवठ्यापैकी एक पंचमांश वाहतूक या सामुद्रधुनीतून होते, त्यापैकी बहुतांशी वाहतूक कतारमधून होते.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम?

सामुद्रधुनी बंद केल्यास जगातील तेलाच्या आणि गॅसच्या ३० टक्के व्यापाराला अडथळा निर्माण होईल. लाल समुद्र किंवा ओमानच्या रस्ते मार्गाने तेल वाहतूक परवडणारी नाही. मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ होईल, विमा खर्च वाढेल, ओमानच्या बंदरांमध्ये वाढ होईल, चार्टर भाडे वाढून सुरक्षेचा धोकाही असणार आहे. परिणामी तेलाच्या किंमती गगनाला भिडतील. जागतिक मंदीही येऊ शकते, ती १९७३ च्या तेल संकटापेक्षाही गंभीर असू शकते. जर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतार सारखे आखाती अरब देश अमेरिकेसोबत इराणविरुद्ध कारवाईत सामील झाले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. हुथी, हिजबुल्ला आणि मिलिशिया यांसारखे इराण समर्थित प्रॉक्सी या प्रदेशात हल्ले वाढवू शकतात.              
 

Related Articles