इराणमधील सहा हवाईतळांवर हल्ला   

तेहरान/ तेल अविव : इस्रायल आणि इराणकडून एकमेकांवर जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र मारा सुरूच आहे. इस्रायलने  पश्चिम, पूर्व आणि मध्य इराणमधील सहा हवाई तळांवर सोमवारी हल्ला केला. यामध्ये इराणची १५ लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर्स आम्ही उद्ध्वस्त केली, असा दावा इस्रायलने केला आहे. 
 
मशहाद, तेहरान, हमादान, देझफुल, शाहिद बख्तियारी आणि तबरीझ या विमानतळांना लक्ष्य केल्याचे इस्त्रायलने सांगितले. तसेच, या हल्ल्यांमध्ये हवाई तळ, भूमिगत बंकर, इंधन भरणारे विमान आणि इराणच्या एफ-१४, एफ-५ आणि एच-१ सारख्या लढाऊ विमानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.दरम्यान, अमेरिकेच्या बंकर ब्लास्टर बाँबमुळे इराणच्या फोर्डो अणु केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अणु विषयक पाहणी विभागाने म्हटले आहे.
 
अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री अतिघातक बंकर ब्लास्टर बाँबचा वापर करुन इस्रायल आणि इराणमधील संघर्षात उडी घेतली होती. बी-२ बाँबर विमानाचा वापर करुन १३ हजार किलोचे बंकर ब्लास्टर बाँब टाकून फोर्डो, नतांज आणि इस्फहान ही अणु केंद्रे बेचिराख केली होती.
 
रविवारी रात्री उशिरा इराणमधील शाहरुद येथील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इंजिन निर्मिती कारखान्यावर बॉम्बहल्ला केला. हे ठिकाण इस्रायलपासून सुमारे २००० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात अनेक इंजिन निर्मिती यंत्रे आणि आवश्यक उपकरणे नष्ट झाली. याशिवाय, इस्रायलने तेहरान, केरमानशाह आणि हमादान येथेही हवाई हल्ले केले.

कुप्रसिद्ध तुरुंगावर इस्रायलचा हल्ला 

इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर दुपारनंतर हवाई हल्ला केला. तसेच फोर्डो येथील अणु केंद्राला पुन्हा लक्ष्य केले. कुप्रसिद्ध एविन तुरुंगावर ड्रोनने हल्ला चढविला. यानंतर परिसरातून काळा आणि पांढरा धूर बाहेर पडला. अमेरिका आणि युरोपीय महासंघाने इराणवर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तुरुंगाचा वापर प्रामुख्याने पाश्चात्य राजकीय नेते आणि नागरिकांना डांबून ठेवण्यासाठी केला जातो. कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात खंडणी उकळण्याचे उद्योग केले जातात. इराणच्या पॅरामिलेट्री रेव्ह्यूलेशनरी गार्डकडून तुरुंग चालविला जातो. तो केवळ तुरुंग नसून ती एक छळछावणी आहे.  कैद्यांबाबत बरा आणि वाईट निर्णय इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी घेत असतात. त्यामुळे तेथील अधिकारी खामेनी यांच्या थेट संपर्कात असतात. 

इस्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्रांचा मारा

तेहरान : अमेरिकेने तीन महत्त्वाची अणु केंद्रे नष्ट केल्यानंतर इराण संतापला असून त्याने सोमवारी इस्रायलवर क्षेपणास्त्र, ड्रोनचा मोठा मारा केला. तर, इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन संरक्षण प्रणालीने वाटेतच अडविली असल्याचा दावा इस्रायलने केला. दरम्यान, इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्रे जॉर्डन देशावरुन जात असताना नागरिकांना सावध करण्यासाठी सायरन वाजविण्यात आले. 
 

Related Articles