पावसाळी अधिवेशनासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती   

पिंपरी : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून सुरू होत असून, अधिवेशनामध्ये लक्षवेधी, तारांकित, अतारांकित प्रश्न, तसेच स्थगन प्रस्ताव महापालिकेला प्राप्त होत असतात. त्यासाठी महापालिकेतील अधिकार्‍यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जारी 
केले आहेत.
 
शहरातील विविध प्रश्नांबाबत स्थानिक आमदार विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करतात. त्याबाबतची माहिती विहित कालावधीत देणे बंधनकारक असते. त्यासाठी महापालिकेच्या वतीने पावसाळी अधिवेशनासाठी समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय विषयक कामकाजासाठी उपायुक्त राजेश आगळे यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमले आहे, तर सहायक समन्वय अधिकारी म्हणून सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांची नियुक्ती केली आहे.
 
अभियांत्रिकीविषयक कामकाजासाठी समन्वय अधिकारी म्हणून शहर अभियंता मकरंद निकम व सहायक समन्वय अधिकारी म्हणून उपअभियंता तथा प्रभारी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वय अधिकार्‍यांनी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने आलेल्या सूचना-निर्देशांचे पालन करावे, तसेच नगरविकास विभागाच्या विधानमंडळाच्या कामकाजाशी संबंधित असलेले टपाल, पत्रव्यवहार प्राधान्याने करावा, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

Related Articles