वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या ५८७ जागा रिकाम्या   

एमपीएससीच्या माध्यमातून भरणार जागा 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या आणि अन्य अधिकार्‍यांच्या ५८७ जागा रिकाम्या असल्याचे नगरविकास मंत्र्यांच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी विधान परिषदेत सांगितले. त्यामुळे, साधनसुविधा असल्या तरी शिकविण्यासाठी प्राध्यापक नसले तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
 
मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात चार वैद्यकीय महाविद्यालये असून एक नायर दंतमहाविद्यालय आहे. शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात ३०८  पदे मंजूर असून ७३ भरलेली आहेत, तर २३५ रिकामी आहेत. लोकमान्य टिळक महाविद्यालयात २३० पदे मंजूर असून  ७२ भरलेली तर १५८ रिकामी आहेत. टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयात १८३ पदे मंजूर असून ५२ भरलेली आहेत, तर १३१ रिकामी आहेत, बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात ६८ पदे मंजूर असून १७ भरलेली आहेत, तर  ५१ पदे रिकामी आहेत. नायर दंत महाविद्यालयात ३२ मदे मंजूर असून २० भरलेली आहेत, तर १२ पदे रिकामी आहेत. अशा एकूण ८२१ पदांपैकी ५८७ पदे रिकामी आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयातील ही पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. मात्र, एमपीएससीमार्फत पदे भरली जात नाहीत तोपर्यंत ३४७ पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत.  यामध्ये साहाय्यक प्राध्यापकांचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले.जागा रिकामे राहण्याचे कारण सांगताना सामंत म्हणाले की, राष्ट्रीय वैद्यकीय परिषेदेचे नियम दर तीन महिन्यांनी बदलतात. हे नियम सरकारच्या नियमात समाविष्ट करण्यासाठी पुन्हा तीन महिने लागतात.
 

Related Articles