गाझातील हवाई हल्ल्यात ६७ ठार   

कॅफेवर इस्रायलच्या विमानांची बाँबफेक

जेरुसालेम : इस्रायलने गाझापट्टीत जोरदार हवाई हल्ले केले. समुद्र किनार्‍यावरील कॅफेवर सोमवारी जोरदार मारा केला. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला तर सैनिकांच्या गोळीबारात २२ ठार झाले. पॅलेस्टिनी नागरिक अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी धावपळ करत असताना इस्रायलने हवाई हल्ला केल्याचे पॅलेस्टिनी रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
 
पहिला हवाई हल्ला गाझा शहरातील अल बक कॅफेवर झाला. तेथे मोठ्या संख्येने ग्राहक आले होते. प्रामुख्याने महिला आणि मुलांची संख्या अधिक होती. इस्रायलने पूर्वसूचनेशिवाय हल्ला चढविला. विमानांनी घटनास्थळी बाँबफेक केली. त्यात सुमारे ३० नागरिक ठार झाले असून अनेक जखमी झाले. अन्य दोन ठिकाणांवरील हल्ल्यात १५ जण ठार झाले, अशी माहिती शैफा रुग्णालयाने दिली. दरम्यान, कॅफे गेल्या २० महिन्यांपासून कार्यरत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची संख्या तेथे रोडावलेली नाही. तेथे इंटरनेट नेटवर्क असून मोबाइल चार्जिंग सेवा दिली जाते. त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आले होते. हल्ल्यानंतरच्या विदारक चित्रफिती समाज माध्यमांवर फिरल्या. परिसरात मृतदेह आणि रक्ताचे सडे पडले असल्याचे त्यात दिसले. जखमींना रुग्णालयात नेतानाची दृश्ये मन हेलावून टाकणारी होती.

ट्रम्प यांना नेतन्याहू भेटणार

तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहे. इराणसोबत संघर्षबंदी झाल्यानंतर त्यांचा पहिला अमेरिका दौरा आहे. दौर्‍यात ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. तसेच भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत. हमाससोबत इस्रायलची संघर्षबंदी होईल, असे ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले. त्यामुळे नेतन्याहू यांच्या दौर्‍याला महत्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे. 
 

Related Articles