कतार, इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा हल्ला   

दुबई/तेहरान : इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर सोमवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे, इराण-इस्रायल संघर्षाची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
कतारमधील अल उदेद हवाई तळावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्याचे सांगतानाच अमेरिकेने अणु केंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा ४८ तासांतच बदला घेतला असल्याचे इराणने म्हटले आहे. अमेरिकेच्या आक्रमकतेला इराणच्या सशस्त्र दलांनी दिलेले हे प्रत्युत्तर असल्याचे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
 
दरम्यान, इराणच्या हवाई हल्ल्याचा कतारने निषेध केला असून, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे म्हटले आहे. कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडला आणि इराणी क्षेपणास्त्रे रोखली, असे कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी म्हटले आहे.या हल्ल्याच्या आधीच खबरदारी म्हणून कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्यानंतर, काही वेळातच हा हल्ला झाला. कतार, इराक, बहरीनसह अन्य भागात अमेरिकेचे लष्करी तळ असून तेथे ४० हजारांहून अधिक सैनिक आहेत. इराणने अणु हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.

हल्ल्यात जीवितहानी नाही 

कतारमधील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची अमेरिकेने पुष्टी केली असून या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या पाचव्या फ्लीट मुख्यालयाचे घर असलेल्या बहरीने त्यांच्या हवाई हद्दीतील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणार

तेहरान : इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ (खाडी) बंद करण्याचा ठराव इराणच्या कायदेमंडळाने मंजूर केला आहे. आता अंमलबजावणीचा अंतिम निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समिती घेणार आहे. 
 
इराणने हा मार्ग बंद केला तर याचा भारतासह जगभरातील अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर‘ अंतर्गत शनिवारी मध्यरात्री इराणच्या तीन महत्त्वाच्या अणु केंद्रांवर तुफान बाँब हल्ले केले. यामध्ये फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील केंद्रांचा समावेश आहे. अमेरिकेने विमानातून ३० हजार पाऊंड  वजनाचे  (१३ हजार किलोचे) बंकर ब्लास्टर बाँब टाकले होते. याआधी, इराण आणि इराकमध्ये अनेक वर्षे संघर्ष सुरु होता. त्यावेळीदेखील इराणने असा निर्णय घेतला नव्हता. 

लष्कराला मोकळीक...

अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्यास सैन्याला मोकळीक दिली असल्याचे इराणचे सर सेनाध्यक्ष जनरल अब्दुल रहिम मुसावी यांनी सांगितले. पश्चिम आशियात विविध ठिकाणी अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. तेथे  हजारो अमेरिकन सैनिक आहेत. त्या ठिकाणांना इराणची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे सहज लक्ष्य करु शकतात, असेही ते म्हणाले.
 

Related Articles