पीडितेला पोलिसांकडून मानसिक त्रास   

स्वारगेट अत्याचार प्रकरण 

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास होत असल्याचा आरोप पीडितेचे वकील असीम सरोदे व वकील श्रीया आवले यांनी केला आहे. पीडितेला पोलिस ठाण्याला या असा आग्रह पोलिस करीत आहेत. कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. पीडितेला वारंवार पोलिस ठाण्याला का बोलविण्यात येत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने सातार्‍याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडितेला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन अत्याचार केला होता. आरोपीला त्याच्या गावाहून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीच्या वकिलांकडून पीडितेबाबत वादग्रस्त विधाने करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. आजमितीला आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, स्वारगेट अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास दिला जात आहे. असे वकिलांचे म्हणणे आहे.
 
आरोपीला जामीन मिळू नये यासाठी त्यांच्या वकिलांच्या मदतीने युक्तिवाद करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यांच्या वकिलांना पुण्याच्या न्यायालयात या खटल्यासाठी येण्यास वेळ नाही. म्हणून पोलिसांनी पीडितेच्या वकिलांना पुढची तारीख घेण्याचा आग्रह करणे, त्यासाठी पीडितेने कोर्टात यावे व पुढची तारीख मागावी असा दबाव आणण्याचे प्रकार झाले. 
 
पोलिसांचे असे वागणे चुकीचे आहे. पीडितेचा असा छळ करणार असाल तर त्याबाबत आम्हाला तक्रार करावी लागेल. तिने घटनेबाबत जबाब दिला आहे व तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आता तिला पुन्हा-पुन्हा पोलीस ठाण्याला लेखी पत्र न देता बोलवणे चालणार नाही, याची पोलिसांनी नोंद घ्यावी, असा इशारा पीडितेच्या वकिलांनी दिला आहे. 

Related Articles