वाहनांच्या उच्च सुरक्षा पाटीसाठी मुदतवाढ   

पुणे : राज्यातील एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्यात येत आहे. या प्रक्रियेत वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी असल्याने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र उच्च सुरक्षा क्रमांक पाटी न लावलेल्या कोणत्याही जुन्या वाहनांची नूतनीकरणाशिवाय कोणतीही कामे करू नका, असे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत.
 
न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा क्रमांक पाटी बसवावी लागणार आहे. आतापर्यंत ६ लाख वाहनांना एचएसआरपी क्रमांक पाटी लावण्यात आली आहे. सर्व वाहनांना क्रमांक पाटी लावण्यासाठी तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, जुन्या वाहनांना सुरक्षा क्रमांक पाटी न बसवल्यास आरटीओत वाहनांसंदर्भात काही कामे करताना नागरिकांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने उच्च सुरक्षा क्रमांक पाटीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. 
 
उच्च सुरक्षा क्रमांक पाटी न लावलेल्या वाहनांना वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढवणे व उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे ही कामे करू नका. ज्या नागरिकांनी सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी केली आहे, त्यांची अडवणूक करू नये. त्यांची खातरजमा करून कामे वेळेत करून द्यावीत. अशा सूचना प्र्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत. 

Related Articles