राज्यात कमी पटसंख्या असूनही शाळा सुरुच : एकनाथ शिंदे   

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत असून, त्या शिक्षकांचे योग्य समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. विद्यार्थी संख्या कमी झाली तरी कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच, सरकारने कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
 
विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज्यमंत्री भोयर बोलत होते. या चर्चेत सदस्य जयंत आसगावकर, ज. मो. अभ्यंकर, अमोल मिटकरी, अभिजित वंजारी, ज्ञानश्‍वर म्हात्रे, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. शिंदे म्हणाले की, राज्यात सध्या 1 लाख 8 हजार शाळा आहेत. त्यापैकी, सुमारे 18 हजार शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा, त्या शाळा सुरूच राहतील. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे तिथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. शिक्षकांची कार्यमुक्तता ही समायोजनानंतरच केली जाईल. केंद्र सरकारने सादर केलेल्या अहवालात राज्यातील 1,650 गावांमध्ये प्राथमिक शाळा तर 6,553 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत, असे नमूद केले आहे. 
 

Related Articles