डी. के. सुरेशकुमार ईडीसमोर हजर   

बंगळुरु : कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे धाकटे बंधू आणि काँग्रेस नेते डी. के. सुरेश एका आर्थिक अफरातफरीशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. 
 
या संदर्भात ईडीने नुकतेच डी. के. सुरेश यांना समन्स बजावले होते. तसेच, चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, ते काल ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी करतानाच अफरातफर प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
 
एप्रिल महिन्यात ईडीने एका छापासत्रानंतर स्थानिक महिला ऐश्वर्या गौडा आणि काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांना अटक केली होती. या महिलेने विविध राजकीय नेत्यांची आपली ओळख असल्याचा दावा केला होता. तिने  सोने, रोख रक्कम आणि बँक ठेवींवर अधिकचा परतावा देण्याचे आश्वासन देताना अनेकांची फसवणूक केली होती. तिने आपण सुरेश यांची बहीण असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात सुरेश यांनी तिच्याविरुद्ध बंगळुरु पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान, ऐश्वर्या आणि त्यांचे पती हरीश के. एन. यांसह अन्य काहींवर आर्थिक अफरातफर प्रकरणात राज्यात अनेक ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत.
 

Related Articles