दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना दिलासा   

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाची हत्या किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. दिशाच्या वडिलांनी केलेल्या अर्जात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला होता. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या वर्षी मार्चमध्ये उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करावी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केली होती. मात्र, दिशा सालियनने स्वतःच्या इच्छेने फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली होती, असे पोलिसांनी उच्च न्यायलयात सांगितले आहे. 
 

Related Articles